छत्रपती संभाजीनगर: फुटलेली महिला विकास आघाडी, निवडुन येणाऱ्या व प्रभावी सरपंचाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा झेंडा हाती घ्यायाला लावणारे नूतन खासदार संदीपान भुमरे, लोकसभा निवडणुकीमध्ये चमकदार कामगिरी करणारे वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, संजय शिरसाठ यांच्यासह एकूण पाच जणांना गद्दार संबोधत शिवसेनेच्या ठाकरे गटाने संभाजीनगरच्या पुनर्बांधणीसाठी नव्याने सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ७ जुलै रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत. या मेळाव्यात शिवसेनेचे निवडून आलेले खासदारही मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात निवडणुकांमध्ये रणनीती ठरविण्याच्या मुद्दयांवर चर्चा होणार आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा गड म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संभाजीनगर जिल्ह्यातील त्यांच्या पाठिराख्यांना बळ द्यायला सुरुवात केल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा लढा रंगण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : १८ व्या लोकसभेला उपाध्यक्ष असणार; विरोधकांना पद देण्याची काँग्रेसची मागणी

छत्रपती संभाजीनगर उद्धव ठाकरे यांच्या गटाचे एकमेव आमदार आहेत. उदयसिंह राजपूत या एकमेव आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. कन्नड लोकसभा मतदारसंघात २००४ च्या निवडणुकीपासून उदयसिंह राजपूत यांचा प्रभाव जाणवू लागला होता. २००४ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून ३३७७९ मते मिळवली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर होते. पुढे २००९ मध्ये ४१ हजार ९९९ मते घेत ते हर्षवर्धन जाधव यांच्याकडून पराभूत झाले होते. विजयासाठी लागणारी मते शिवसेनेमुळे मिळाली ती उद्धव ठाकरे यांच्या नावामुळे होती ही जाण असल्याने आपण पक्ष बदलला नाही, असे राजपूत सांगत असतात. जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात ठाकरे गटाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. आमदार संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, प्रा. रमेश बोरनारे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार या पाच आमदारांचा यात समावेश होता. या सर्वांना लोकसभा निवडणुकीमध्ये ‘ गद्दार ’ संबोधून तसेच संदीपान भुमरे यांच्या मद्यविक्री व्यावसायावरुन त्यांच्यावर टीका करुनही उद्धव ठाकरे यांना यश मिळाले नव्हते. आता पुन्हा गद्दार या मुद्दयासह शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन शिवसेनेचा ठाकरे गटा विधानसभा निवडणूक लढिवण्याविषयी रणनीती ठरिवणार आहे. ७ जुलै रोजी होणारे हे शिबीर विधानसभेचे रणशिंग असेल असे सांगण्यात येत आहे. शहरातील सूर्या लॉन्स येथे होणाऱ्या या मेळाव्यात ठाकरे गटातील नेते हजेरी लावणार असल्याने लोकसभेच्या पराभवामुळे आलेली मरगळ दूर करण्यासाठी नेते प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray in chhatrapati sambhajinagar for upcoming assembly elections 2024 print politics news css