छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे शिवसेनेने ( ठाकरे) निश्चित केली आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून राजू शिंदे, सिल्लोडमधून सुरेश बनकर, औरंगाबाद (मध्य) किशनचंद तनवाणी व वैजापूरमधून दिनेश परदेशी व कन्नडमधून उदयसिंह राजपूत अशी पाच उमेदवारांची नावे निश्चित झाल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. निश्चित करण्यात आलेल्या पाच उमेदवारांपैकी दाेन उमेदवार भाजपमधून आले आहेत तर किशनचंद तनवाणी हे भाजपच्या मांडवात काही दिवस रमले होते. त्यांनी भाजपमध्ये जिल्हाध्यक्षपदही सांभाळले होते. दरम्यान संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात उमेदवारीचा निर्णय झालेला नाही.

जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे जागावाटपही पूर्ण झाले असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. फुलंब्री, औरंगाबाद पूर्व या दोन जागा काँग्रेस पक्षाकडे तर गंगापूरची एक जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षास देण्यात आली आहे. गंगापूर मतदारसंघातून अजित पवार गटातून पक्षशिस्त मोडल्याने निलंबित करण्यात आलेल्या सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षात स्थान दिले जाईल. ते उमेदवार असतील हेही आता स्पष्ट हाेऊ लागले आहे. मात्र, उमेदवारीची तशी अधिकृत घोषणा झाली नाही.

हेही वाचा – उल्हासनगरच्या आखाड्यात यंदा मोठा संघर्ष

हेही वाचा – भाजप प्रदेश कार्यालयातून प्रसिद्धीमाध्यमे तडीपार ?

औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ काँग्रेस पक्षास सोडण्यात आला आहे. २०१९ मध्येही हा मतदारसंघ काँग्रेसकडे सोडण्यात आला होता. मात्र तडजोडीच्या राजकारणात काँग्रेसने ही जागा समाजवादी पक्षास दिली होती. त्यामुळे या वेळी काँग्रेसकडून पूर्वमध्ये उमेदवार दिला जाईल का, असा प्रश्न अनुत्तरीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिल्लोड मतदारसंघात मंत्री सत्तार यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे उमेदवार कोण असा प्रश्न चर्चेत होता. शुक्रवारी भाजपमधील बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. सुरेश बनकर यांची उमेदवारीही जाहीर करण्यात आली. औरंगाबाद मध्य मतदारसंघात प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. उमदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी लढती नक्की झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील दोन मतदारसंघांत काँग्रेस, एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवेल असे ठरविण्यात आले. कन्नड मतदारसंघातून उदयसिंह राजपूत यांच्या उमेदवारीवरून कोणताही वाद नव्हता. वैजापूर मतदारसंघात डॉ. दिनेश परदेशी यांचे नावही जवळपास निश्चित होते. जिल्ह्यातील नऊ पैकी पाच मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल. भाजपच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा उमेदवार असणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा शिवसेनेचा प्रचार काँग्रेसला उपयोगात पडेल, असे दिसून येत आहे.