अविनाश कवठेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अकारण टीका केल्याच्या नाराजीतून शिवसेनेचे माजी शहर प्रमुख शाम देशपांडे यांनी शिवसेनेचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला, त्या निर्णयाचे राजकीय परिणाम काय होतील, याची चर्चा शहरात रंगलेली असतानाच शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने देशपांडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे देशपांडे यांच्या हकालपट्टीचा कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सध्या तरी शिवसेनेचे फारसे नुकसान होणार नाही, असे चित्र आहे.
मुंबई येथे बीकेसीमध्ये झालेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली होती. या सभेनंतर देशपांडे यांनी पक्षाचे काम थांबविण्याचा निर्णय जाहीर केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडणी केलेल्या हिंदुत्वाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक दिशा दिली. मात्र संघावर अकारण राजकीय टीका करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही दिशा भरकटवली आहे. संघाला राजकीय वादामध्ये प्रत्यक्ष ओढून शिवसेनेने काँग्रेसची री ओढली आहे, अशा शब्दात देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. देशपांडे यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेचे नुकसान होईल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात शिवसेेनेला त्याचा फारसा फटका बसणार नाही, असे चित्र आहे.
शिवसेनेच्या शहर प्रमुखपदाची जबाबदारी देशपांडे यांनी काही वर्षे सांभाळली. महापालिकेची सन २०१७ मधील निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढविण्याबाबत ते उत्सुक होते. मात्र राजकीय गणिते जमली नाहीत. त्यामुळे त्यांनी सन २०१७ ची निवडणूक मयूर काॅलनी-डहाणूकर काॅलनी या प्रभाग क्रमांक बारामधून लढविली. मात्र, या निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांच्याकडे शहर प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. निवडणुकीनंतर देशपांडे पक्षात सक्रिय असल्याचे दिसत नव्हते. शिवसेनेचे पदाधिकारीही त्याला दुजोरा देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनप्रसंंगी त्यांनी मोदी यांच्या स्वागताचे फलक लावले होते. त्याचवेळी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट झाली आणि ते शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
देशपांडे हे सन १९७२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम पाहात होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुणे महापालिकेत ते तीन वेळा निवडून गेले. सन २०००-२०१२ या कालावधीत ते नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या पुणे पॅटर्न मध्ये त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले. शिवसेनेने त्यांना विधानसभेचीही उमेदवारी दिली होती. संघटन कौशल्य नसल्याने त्यांच्या पक्षांतराने कोणताही फरक पडणार नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात येते. देशपांडे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा आहे. मात्र त्यांना प्रवेश दिला जाईल का,याबाबतही संदिग्धता आहे. देशपांडे ज्या प्रभागातून निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत, त्या प्रभागात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह चारही नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापून त्यांना संधी मिळण्याची शक्यताही कमीच आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारीसाठीची स्पर्धा तीव्र होणार आहे. आगामी महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) होणार असल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्येच उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा आहे. त्यातच विद्यमान नगरसेवकांना डावलून आयात उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. किंबहुना तसे धोरण शहर भाजप स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करूनही देशपांडे यांच्या हाती फारसे काही लागणार नाही, असे म्हटले जाते.
शिवसेनेचे काम थांबविण्याचा निर्णय जाहीर करताना देशपांडे यांनी हुशारी दर्शविली होती. त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील टीकेमुळे काम थांबवित आहे, असे त्यांनी म्हटले होते. राजीनामा न दिल्याने ते पक्षात होते. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. त्यामुळे त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.