चंद्रपूर : आयुष्यभर काँग्रेसच्या कुबड्यांचा आधार घेऊन राजकारण करणाऱ्या व आताही काँग्रेस नेत्यांना सर्वप्रकारची उघड मदत करणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी जिल्हा भाजपमधील गटबाजी बघता, ‘लोक भाजपची काँग्रेस झाली असे म्हणतील, तेव्हा वेळीच वाद संपुष्टात आणा,’ असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे नाव न घेता केले. शोभा फडणवीस यांना हा सल्ला देण्याची उपरती आताच का झाली, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
फडणवीस यांचे राजकारण जिल्हावासीयांना सर्वश्रुत आहेच. मूल विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री वामनराव गड्डमवार यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी काँग्रेस नेत्याशी हातमिळवणी केली होती. त्यानंतरही त्यांनी राजकारणात यशस्वी होण्यासाठी काँग्रेस नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासले, याची साक्ष काही लोकसभा निवडणूक निकालाने दिली आहे. मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांना याची पूर्ण जाणीव आहे. फडणवीस आताही चंद्रपूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून मूल येथील काँग्रेस नेत्यांना आशीर्वाद देतच आहेत.
आता मात्र त्यांना, ‘भाजपची काँग्रेस होईल,’ असे वाटते आहे. यासाठी निमित्त ठरले भाजप स्थापनादिनाचे. शहरात भाजप स्थापनादिनानिमित्त दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले गेले. मुनगंटीवार यांचे समर्थक भाजप शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी एका कार्यक्रमाचे, तर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले. जोरगेवार यांच्या कार्यक्रमात फडणवीस यांनी मुनगंटीवार यांचे नाव न घेता टीका केली. चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार जोरगेवार आहेत, यामुळे मानसन्मान बाजूला ठेवून मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायला हवे होते. अशा प्रकारामुळे भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. ज्येष्ठ नेत्यांनी गटबाजी टाळायला हवी. आज पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक जण रांगेत उभे आहेत. पक्ष मोठा होत असताना असल्या प्रकारामुळे जनमानसात वाईट प्रतिक्रिया उमटत आहे. यामुळे भाजपची काँग्रेस होण्यास वेळ लागणार नाही, असा सल्लावजा इशारा त्यांनी यावेळी दिला.
भाजपच्या जिल्ह्यातील जेष्ठ नेत्या फडणवीस यांचा हा सल्ला पक्ष हितासाठी योग्यच. मात्र, हा सल्ला देताना त्यांनी आपल्या संपूर्ण सक्रिय राजकीय कारकीर्दीत कोणाची मदत घेतली? कोणत्या काँग्रेस नेत्याशी मैत्री जोपासली, हेही आठवावे, असे भाजप निष्ठावंत बोलत आहेत. शिवाय, त्यांना आताच हा सल्ला देण्याची उपरती का झाली, असा प्रश्न राजकीय अभ्यासकांनाही पडला आहे.
© The Indian Express (P) Ltd