काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (सरद पवार) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमख यांना पक्षाने उमेदवारी दिली असली तरी त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सलील हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती असून सलील देशमुख यांचे ‘चला उमेदवारी भरायला’ असे आवाहन करणारे निवेदन समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. देशमुख यांच्या माघारीने या मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता आहे.

१९९५ ते २०१९ या काळात फक्त २०१४ चा अपवाद वगळता अनिल देशमुख काटोल मतदारसंघातून विजयी होत आले. काटोल हा देशमुखांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच पक्षाने त्यांना २०२४ मध्ये पुन्हा उमेदवारी दिली होती. पण गृहकलह त्यांच्या निवडणुकीच्या मार्गात आड आल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्याच यादीत देशमुख यांचे नाव होते. पण दुसऱ्याच दिवशी अनिल देशमुख यांनी ते स्वत: लढणार की पुत्र सलील लढणार याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते. रविवारी समाजमाध्यमांवर सलील देशमुख यांचे ‘चला उमेदवारी अर्ज भरायला’ हे आवाहन प्रसारित झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कला उधान आले आहे. यासंदर्भात सलील देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

हेही वाचा – अमरावती जिल्‍ह्यात दोन आमदारांची फरफट, महायुतीने नाकारले, इतरांनीही झिडकारले

गृहकलहातून निर्णय ?

सलील देशमुख यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी वडिलांकडे आग्रह धरला होता. त्यांनी मतदारसंघात प्रचारही सुरू केला होता. देशमुख कारागृहात असताना मतदारसंघात तेच फिरत होते. २०१९ च्या निवडणुकीतही हीच स्थिती होती. पण देशमुख यांनी तेव्हा ठाम भूमिका घेत स्वत: निवडणूक लढवली होती. यावेळी देशमुख यांनी माघार का घेतली हे अद्याप कळू शकले नाही. मात्र त्यांच्या माघारीमुळे राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित आहे.

सतीश शिंदे पवार गटात

जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व काटोल विधानसभा मतदारसंघातील नेते सतीश शिंदे सोमवारी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. सतीश शिंदे यांनी याला दुजोरा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून अधिकृतपणे आपण सोमवारी प्रवेश घेणार असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – भिवंडीत काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे वारे

भाजपच्या उमेदवाराकडे लक्ष

भारतीय जनता पक्षाने काटोल मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. या पक्षाचे नेते आशीष देशमुख व चरणसिंह ठाकूर हे दोघे येथे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यापैकी कोणाला उमेदवारी मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.