केंद्रीयगृहमंत्री अमित शाह यांनी आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला वाटतं की दिल्ली ‘ आप ‘ निर्भर रहावी आणि भाजपाला देशाची राजधानी दिल्ली ‘आत्मनिर्भर ‘ झालेली हवी आहे. यावेळी त्यांनी जनतेला उद्देशून म्हटले की, तुमच्याकडे जाहिरातबाजीचे राजकारण आणि विकासाचे राजकारण या दोघांपैकी एक निवडण्याचा पर्याय आहे.
दिल्ली महागरपालिका निवडणुकीत लोकांनी आपल्याला ‘ आप ‘ निर्भर हवं की ‘आत्मनिर्भर ‘ यापैकी निवड करावी, असं अमित शाह म्हणाले. ते तेहखंड येथे वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी प्लांटचे उद्धाटन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी केजरीवाल सरकारने या अगोदरच्या तीन महानगरपालिकांना सावत्र आईप्रमाणे वागणूक दिल्याचाही आरोप केला.
केजरीवाल सरकारकडे या तिन्ही महापालिकांचे ४० हजार कोटी रुपये थकीत असल्याचाही दावा त्यांनी केला. आता पूर्व, उत्तर आणि दक्षिण महानगरापालिकेचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. अमित शाह म्हणाले, दिल्ली काय आम आदमी पार्टीवर अवलंबून रहावी अशी केजरीवालांची इच्छा आहे. तर दिल्ली स्वावलंबी असावी अशी आमची इच्छा आहे. आगामी दिल्ली महापालिका निवडणुकीत लोकांना याची निवड करावी लागेल की त्यांना आम आदमी पार्टीवर अवलंबून रहायचे की स्वावलंबी बनायचं.
याशिवाय अमित शाह यांनी आम आदमी पार्टीवर जाहिरातबाजीसाठी मोठा पैसा खर्च केल्याचाही आरोप केला. अमित शाह म्हणाले की, जाहिरातबाजीने विकास होतो असं केजरीवाल मानतात, मात्र त्यांचा हा भ्रम फारतर पाच ते सात वर्ष काम करू शकतो. अशावेळी तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कोणतं राजकारण निवडणार जाहिरातबाजीचं की विकासाचं राजकारण.