लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार हे अद्याप ठरले नाही. मात्र नागपूरचाच मुख्यमंत्री होणार याची चर्चा मात्र भाजपमध्ये जोरात आहे. जर असे झाले तर मंत्री म्हणून नव्या मंत्रिमंडळात नागपूरमधून कोणाला संधी मिळणार ? मंत्रीपद नागपूर शहराला मिळणार की ग्रामीणला ? याबाबत तर्क लावले जात आहेत.

२०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा एक मंत्रिपद ग्रामीण भागाला देण्यात आले होते. कामठीतून विजयी झालेले चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी मिळाली होती. ते पाच वर्षे पालकमंत्री होते. २०२४ मध्ये नागपूर जिल्ह्यातून भाजपचे १२ पैकी ८ उमेदवार निवडून आले. त्यात शहरातून चार आणि ग्रामीणमधील चार जणांचा समावेश आहे. फडणवीस सलग सहाव्यांदा, खोपडे , बावनकुळे चौथ्यांदा, समीर मेघे सलग तिसऱ्यांदा आणि मोहन मते, सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. प्रवीण दटके, चरणसिंह ठाकूर प्रथमच विधानसभेवर निवडून आले. आशीष देशमुख २०१९ च्या खंडानंतर दुसऱ्यांदा विजयी झाले.

आणखी वाचा- ईव्हीएम विरोधात एकेकाळी रान उठविणारे चंद्राबाबू नायडू भाजपासह सत्तेत जाताच झाले शांत; भूमिकेत एवढा बदल कसा झाला?

मंत्रीपदासाठी ग्रामीण भागाचा विचार करता बावनकुळे सध्या प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांचा दावा प्रबळ ठरतो. त्याच प्रमाणे हिंगण्यातून समीर मेघे यांना मागच्या अडिच वर्षात संधी मिळाली नाही, त्यामुळे यावेळी ते दावा करू शकतात. फडणवीस, गडकरी यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.त्यामुळे त्यांचीही दावेदारी प्रबळ ठरते. सावनेरमधून काँग्रेस नेते सुनील केदार यांचे वर्चस्व मोडीत काढून निवडून आलेले आशीष देशमुख यांना पक्ष कोणती जबाबदारी देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काटोलमधून चरणसिंह ठाकूर प्रथमच विधानसभेवर निवडून गेले आहेत.

आणखी वाचा-Constitution : “सत्तेत असलेल्या लोकांमध्ये हे गुण नसतील तर…”, संविधान सभेच्या शेवटी डॉ. राजेंद्र प्रसादांनी दोन गोष्टींवर व्यक्त

शहराचा विचार केल्यास कृष्णा खोपडे हे विदर्भातून सर्वाधिक मताधिक्याने म्हणजे एक लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. त्यांचा खुद्द फडणवीस आणि बावनकुळे यांनी सत्कार केला. लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या पूर्व नागपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार नितीन गडकरी यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यावेळी शहरात एक मंत्रिपद द्यायचे झाल्यास त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. मोहन मते आणि प्रवीण दटके हे कट्टर फडणवीस समर्थक म्हणून ओळखले जातात. दोघांचीही कारकीर्द महापालिकेच्या राजकारणातून सुरू झाली असून त्यांना नागरी समस्यांची माहिती आहे. दटके माजी महापौर होते व सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. मते आमदार होते व त्यांनीही स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे आगामी नागपूर महापालिका निवडणुकीचा विचार केल्यास या दोन नावांपैकी एका नावाचा विचार पक्षाकडून होऊ शकतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should minister post in nagpur go to city or a rural nagpur print politics news mrj