पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीचे पडघम देशभर वाजू लागले आहेत. विरोधक भाजपाविरोधात आघाडी उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विरोधकांच्या या प्रयत्नाबाबत देशाचे माजी पंतप्रधान आणि जेडी(एस) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी भाष्य केले आहे. मंगळवारी जेडीएसच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या देशातील असा कोणता पक्ष आहे, जो भाजपाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडला गेलेला नाही, असा प्रश्नच देवेगौडा यांनी उपस्थित केला. भाजपाविरोधी आघाडीत जेडीएस सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला असता देवेगौडा म्हणाले, “मी राष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषण करू शकतो. पण त्याचा आज काय फायदा? मला असा एक पक्ष दाखवा, जो भाजपासोबत एकदाही गेलेला नाही. त्यानंतर मी उत्तर देईल.” कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीएसला मोठ्या पराभवाचे तोंड पाहावे लागले. जेडीएसला केवळ १९ जागा या वेळी मिळवता आल्या. त्यासोबतच मागच्या निवडणुकीच्या तुलनेत जेडीएसच्या मतदानाची टक्केवारीदेखील कमी झाली.

देवेगौडा पुढे म्हणाले, “काँग्रेस कदाचित यावर वाद घालू शकते. त्यांनी कधीही भाजपाला पाठिंबा दिला नाही, असे ते म्हणू शकतात. पण त्यांनी एम करुणानिधी यांना पाठिंबा दिला नव्हता का? त्या वेळी सहा वर्षं त्यांना (भाजपाला) कुणी पाठिंबा दिला. अशा प्रकारची अनेक उदाहरणे आहेत. कधी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे असा पाठिंबा दिला गेला आहे. म्हणूनच मी या विषयावर चर्चा करू इच्छित नाही. या देशातील प्रचलित राजकारणाच्या वातावरणावर मी वाद घालण्याचे कोणतेही कारण नाही. मला हा देश चांगलाच माहीत आहे. मी १९९१ पासून विविध पदांवर काम करत आलो आहे. पंतप्रधानपद, मुख्यमंत्री आणि खासदार म्हणूनही काम केले. या काळात मी ही संपूर्ण प्रक्रिया पाहिली आहे.”

हे वाचा >> जनता दलाच्या पिछेहाटीबरोबरच देवेगौडा कुटुंबातच पराभवांची मालिका सुरू

आणखी एका प्रश्नाचे उत्तर देत असताना देवेगौडा म्हणाले की, या देशात कोण सांप्रदायिक आहे, कुणी नाही. हे मला माहीत नाही. सर्वात पहिल्यांदा सांप्रदायिकतेची व्याख्या व्यापक करायला हवी, कारण त्याची व्याप्ती विस्तृत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपाशी युती करणार का, या प्रश्नावर उत्तर देताना देवेगौडा म्हणाले की, आम्ही लोकसभेआधी होत असलेल्या बंगळुरु स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत आहोत.

पुढची लोकसभा निवडणूक लढविणार का? यावर ९१ वर्षीय देवेगौडा म्हणाले की, प्रश्नच उद्भवत नाही. “लोकसभा निवडणूक किती उमेदवार लढविणार हे पक्ष ठरविणार आहे. स्थानिक स्वराज संस्थेच्या निकालानंतर किती लोकसभेच्या जागा लढवाव्यात यावर निर्णय घेतला जाईल. राज्यातील सीपीआय (एम) आणि इतर राजकीय पक्षांसोबत आमचे संबंध आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल,”अशी भूमिका देवेगौडा यांनी मांडली.

देवेगौडा यांचे सुपुत्र आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामीदेखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, जेडीएस पक्ष पुन्हा एकदा आपली संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशानुसार आम्ही प्रत्येक समाजाला नेतृत्व देणार आहोत. प्रत्येक समाजाच्या नेत्यामार्फत त्यांच्या समाजामध्ये पुन्हा एकदा पक्षाबाबत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. यासोबतच ३० जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधण्याची सुरुवात करण्यात आल्याचेही कुमारस्वामी यांनी सांगितले.

जेडीएसने आयोजित केलेल्या या चिंतन बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम आणि युवक संघटनेचे अध्यक्ष निखिल कुमारस्वामी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Story img Loader