हर्षद कशाळकर
अलिबाग : वकिली व्यवसायातून समाजकारणात आणि राजकारणात आलेल्या श्रद्धा ठाकूर यांनी गेल्या काही वर्षांत जिल्हा, प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. गेली सात वर्षे त्या रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा म्हणून सध्या कार्यरत आहेत.
हेही वाचा… डॉ. राहुल पाटील : रचनात्मक कार्यातून राजकारण
श्रद्धा ठाकूर यांचे बालपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे गेले. तेथीलच एसपीके महाविद्यालयातून भौतिकशास्त्र विभागातून पदविका प्राप्त केली. लग्नानंतर त्या अलिबागला स्थायिक झाल्या. लग्नानंतर अलिबाग येथील विधि महाविद्यालयातून पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. नंतर त्यांनी अलिबाग न्यायालयात वकिलाला सुरुवात केली. या व्यवसायात हळूहळू जमही बसविला होता. तोवर राजकारणात येण्याची त्यांची फारशी इच्छाही नव्हती. पण महिलांसाठी सामाजिक काम सुरू होते.
हेही वाचा… प्रवीण दटके : निष्ठावंत कार्यकर्ता
अलिबाग नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना राजकारणात उतरण्याची संधी प्राप्त झाली. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोर जावे लागले. मात्र निवडणुकीत पराभव झाला तरी त्यांनी पक्षात आपला जम मात्र बसवला. काँग्रेसच्या महिला संघटनेत कामाला सुरुवात केली. जिल्हा आणि प्रदेश पातळीवर त्यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यामुळे २०१८ साली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदावरही त्यांची वर्णी लागली. पक्षांतर्गत कामाची दखल घेऊन त्यांना गेल्या विधानसभा निवडणूकीत अलिबाग मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र या उमेदवारीवरून ठाकूर कुटुंबातील वाद उफाळून आले. एकाच कुटुंबातील तीन सदस्य या उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यामुळे कुटुंबातूनच मिळालेली उमेदवारी नाकारावी असे सांगण्यात आले. मात्र त्या निवडणूक लढविण्यावर ठाम राहिल्या. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे दीर राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला. पक्षाच्या मतांचे विभाजन झाल्याने श्रद्धा ठाकूर यांना पराभवाला जावे लागले.
हेही वाचा… महेश शिंदे : विकासकामांची दूरदृष्टी
बॅरिस्टर ए आर अंतुले, मधुकर ठाकूर आणि माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. अशा प्रतिकूल काळात पक्षाच्या महिला संघटनेची जाबाबदारी त्या यशस्वीपणे संभाळत आहेत.