मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेचे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटानेही जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र शिंदे गटाचे नेतेे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रविवारी वरळीकरांशी संवाद साधत मुंबईत महायुतीच्या अधिकाधिक जागा जिंकून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
श्रीकांत शिंदे यांनी शिवडी, भायखळ्यानंतर रविवारी वरळीकरांशी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी बेलताना म्हणाले, ‘शिवडी, भायखळा, वरळी, विक्रोळी, भांडूप या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये बैठका होणार आहेत. त्यापैकी भायखळा व शिवडी विधानसभा मतदारसंघात बैठका झाल्या आहेत. या बैठकींत प्रत्येक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी बोलून लोकांच्या समस्या जाणून घेण्याच्या प्रयत्न करत आहे. असे बरेच विषय कशा पद्धतीने मार्गी लागतील याकरिता या जनसंवाद यात्रेतून सुरुवात झाली आहे. मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ आहे. मुंबई आणि शिवसेनेचे एक वेगळे नाते आहे. यामुळे या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करायला हवे,’ असे ते म्हणाले.