सांगली : बालेकिल्ला अशी एकेकाळी असलेली सांगलीची ओळख पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी काँग्रेसने शेजारच्या कर्नाटकातील विजयाचा आधार घेण्याचे निश्चित केले आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पाताळीवर सोडून भाजपच्या आक्रमक प्रचाराला तोंड देण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सांगलीत आमंत्रित करण्यात आले असून, त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने आक्रमकपणे भाजपसोबतच आघाडीअंतर्गत असलेल्या स्पर्धक राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केले जात आहेत.
लोकसभेसाठी अद्याप चेहरा निश्चित नसताना काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू होत आहे. नऊ वर्षांपूर्वी मोदी यांच्या झंझावाती लाटेमध्ये काँग्रेसकडून पारंपारिक उमेदवार म्हणून वसंतदादा घराण्यातील प्रतिक पाटील मैदानात उतरले होते. टीम राहूल यांच्या यंग ब्रिगेडमधून त्यांना केंद्रात राज्यमंत्री पदही देण्यात आले होते. मात्र, मिळालेल्या मंत्रिपदाचा काहीच उपयोग जिल्ह्याला झालेला नव्हता. लोकसंपर्क नसल्याने याचा फटका काँग्रेसला तर बसलाच पण, मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने मदत तर केलीच नाही, मतांचे दान मात्र भाजपच्या पदरात टाकले. राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपवासीय झालेल्या संजयकाका पाटील यांना खासदारकीची लॉटरी लागली. हा इतिहास झाला असला तरी त्यानंतर काँग्रेसची सत्तेपासूनच फारकत जी झाली ती आजतागायत सुरूच आहे.
महापालिका, जिल्हा परिषदेमध्ये संख्याबळ असूनही राष्ट्रवादीच्या मागे फरपट सुरूच राहिली आहे. आता मात्र, राज्यपातळीवर सावरत असलेली काँग्रेस जिल्ह्यात मात्र अजूनही अंधारात चाचपडत असल्याचे दिसते. सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता मिळाली, मात्र लाभाच्या पदावरून महाविकास आघाडीअंतर्गत धुसफूस सुरूच असल्याचे दुय्यम बाजार आवाराच्या सभापती निवडीवेळी दिसून आले. सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा गत वेळच्या निवडणुकीवेळी उमेदवारासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली. याला कारणीभूत आहे तो दादा घराण्यात असलेला संघर्ष. प्रतिक पाटील यांनी उमेदवारीसाठी आग्रहच धरला नाही. अखेरच्या क्षणी विशाल पाटील यांनी उमेदवारीसाठी आक्रमकपणा दाखवला. मात्र, तोपर्यंत सांगलीची जागा स्वाभिमानीला देण्यात आली. स्वाभिमानीकडे सक्षम उमेदवारच नसल्याने अखेरच्या क्षणापर्यंत घोळ सुरू राहिला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचे रान उठवूनही अपेक्षित यश पदरी पडले नाही. भाजपचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवर पर्याय देण्याचा प्रयत्न केला असला तरी ही उमेदवारी भाजपच्या विजयासाठी पोषकच ठरली. गत निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव हा केवळ पडळकर यांच्या उमेदवारीमुळे झाला हे मान्यच करावे लागेल. मात्र, गतवेळच्या पराभवानंतर दादा घराण्याने नेतृत्वासाठी पुढे येण्याची गरज होती. तथापि, विधानसभा की लोकसभा या द्बिधा मनस्थितीत असलेल्या विशाल पाटील यांनी आता कुठे पत्ते उघड करायला सुरूवात केली आहे.
राष्ट्रवादीने उमेदवारीवर दावा केल्यानंतर जाग आल्यानंतर उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. रेल्वेचे तिकीट माझ्या हाती आहे मग रेल्वे कशी जाईल अशा कल्पनेत असून राजकारण करता येत नाही. बाजार समिती निवडणुकीत जसा आक्रमकपणा दाखवला तसाच आक्रमकपणा दाखवला तरच राष्ट्रवादीमागे होत असलेली काँग्रेसची फरपट थांबणार आहे. विधानसभेची उमेदवारी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना की जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांना हे लगेच स्पष्ट होणार नसले तरी पाटील यांनी गत निवडणुकीत घेतलेले मतदानही नजरेआड करता येणार नाही.
हेही वाचा – जमाखर्च : तानाजी सावंत, एक रिंगण वादाचे, दुसरे बलवानपणाचे!
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सत्काराच्या निमित्ताने काँग्रेस एंकसंघ आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला जाईल. या सत्काराच्या निमित्ताने काँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. हा कार्यक्रम माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने होत असल्याचे स्पष्टच आहे. सत्काराचा कार्यक्रम पलूस-कडेगावमध्ये करण्याचे ठरले होते, तर जतचे आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी जतसाठी आग्रह धरला होता. तो डावलून सांगलीत सत्काराचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले. आता सध्या तरी काँग्रेसमधील सर्व गट एकत्र असल्याचे भासवत असले तरी हे ऐक्य अखेरपर्यंत टिकणार का? लोकसभा मतदारसंघातील सहापैकी दोन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत, तर सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व कदम गटाकडे होते. राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील या केवळ एकमेव आमदार आहेत, तर सांगली व मिरज मतदारसंघ भाजपकडे आणि खानापूर-आटपाडी शिवसेना शिंदे गटाकडे आहे. सहाही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा मतदार आहे. यामुळे आघाडीतील सुसंवाद राखण्यात काँग्रेस यशस्वी ठरली तरच या आशादायक स्थिती आहे.
सिद्धरामय्या यांच्या सत्काराच्या निमित्ताने रविवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहेत. मागील निवडणुकीवेळी पडळकर यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसपासून बाजूला गेलेला ओबीसी समाज पुन्हा काँग्रेसकडे वळविण्याचा प्रयत्न या सत्काराच्या निमित्ताने काँग्रेसचा राहील.