सौरभ कुलश्रेष्ठ

मुंबई : गेल्या दोन अडीच वर्षांत संपर्क-संवादाचा अभाव दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्चपासून राज्यात सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील बैठकांमध्ये स्थानिक शिवसेना आमदार, पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीविरोधात आणि त्यातही राष्ट्रवादीच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त झाल्याने शिवसेनेतील बंडाचे संकेत मिळाले होते. याच नाराजीचा स्फोट राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीतून झाला आहे.

भाजप आपल्यासोबत युती करून सत्ता मिळवत असताना आपल्याच पक्षाला खिंडार पाडण्याचे डाव टाकत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतापले होते. युती सरकार असतानाही एकनाथ शिंदे काही आमदारांसह फुटणार अशा बातम्या यायच्या. शिवसेना फोडण्याचे काम आज ना उद्या भाजप करणार या रागातूनच २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत संधी मिळताच ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग करून आपल्या नाराजीला वाट करून दिली. या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या रूपात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले. पण त्यावेळीही अनेक शिवसेना आमदारांना ही आघाडी रुचली नव्हती. ज्या राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या विरोधात निवडून येतो त्यांच्याबरोबर सरकार कसे असा प्रश्न त्यांना पडला होता. पण पक्षनेतृत्वासमोर ही मंडळी त्यावेळी शांत राहिली.

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तरी आपली कामे होत नाहीत, शिवसेनेच्या आमदारांना विकास निधीत डावलले जाते अशा उघड तक्रारी पहिल्या वर्षीनंतर सुरू झाल्या. फेब्रुवारीतील विधिमंडळ अधिवेशनात शिवसेना व सहयोगी आमदारांच्या नाराजीचा कडेलोट झाला होता. ही मोठ्या प्रमाणातील नाराजीची पहिली जाहीर ठिणगी होती. पण त्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही. विधिमंडळ अधिवेशन संपताच शिवसेनेने राज्यात शिवसंपर्क अभियान सुरू केले. त्याअंतर्गत शिवसेनेचे खासदार व नेते विविध लोकसभा मतदारसंघात गेले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात या शिवसंपर्क अभियानाच्या बैठकांवेळी शिवसेना आमदारांच्या नाराजीचा भडका उडाला. नेत्यांसमोर नाराजीचा पाढा वाचून शिवसेनेचे आमदार व पदाधिकारी थांबले नाहीत तर महाविकास आघाडी पक्षाच्या मुळावर येत असल्याचा इशाराही काही जणांनी दिला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस कशारितीने शिवसेनेला त्रास देते याचे दाखलेही देण्यात आले. त्यावर पक्षनेतृत्वाच्या कानावर ही नाराजी घालण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण शिवसेनेत आतल्या आत मोठ्या प्रमाणात खदखद असून त्याचा कधीही स्फोट होईल असे संकेत त्या अभियानात मिळाले होते. राज्यसभा निवडणुकीत सहयोगी व अपक्ष आमदारांनी व विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या आमदारांनी आपली मते भाजपला देत पहिला झटका दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे बंड झाले आहे.

Story img Loader