लातूर : शिवसेनेच्या आवाजामुळे बाकी विरोधी पक्ष गप्प बसायचे, ताकद कमी असली तरी आवाज अधिक मोठा हे शिवसेनेचे वैशिष्ट्य. मात्र यावेळी निवडणुका जवळ येऊनही शिवसेनेचा आवाज मात्र येत नाही. स्थानिक पातळीवरील नेते शांत असून, राज्यस्तरावरुन काही हालचालीच होत नाही.
लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ हा महायुतीत शिवसेनेकडे होता. २००९ व १४ अशा दोन निवडणुकांत शिवसेनेच्या उमेदवाराचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. २०१९ ला ही जागा भाजपने आपल्याकडे घेतली व त्या बदल्यात लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला दिली.
हेही वाचा – कारण राजकारण : मुलीच्या बंडामुळे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासमोर दुहेरी आव्हान !
लातूर ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली व औशाची जागा भाजपने काँग्रेसचा पराभव करून ताब्यात घेतली. ठाकरे गटाने लातूर जिल्ह्यात औसा विधानसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला होता मात्र आता लातूरचे आमदार अमित देशमुख हे मराठवाड्याचे नेते झाले आहेत व त्यांनी औसा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा दावा सांगितला आहे. त्यांनी दावा सांगितल्यानंतर शिवसेनेचे दिनकर माने अथवा संतोष सोमवंशी भाष्य करायला तयार नाहीत. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत आमच्याकडे आहे व शिवसेना येथून लढेल इतका उच्चार करायला देखील शिवसेनेचा आवाज बसला आहे.
हेही वाचा – धनगर समाजाला आरक्षण अशक्य?
शिंदे गटाचेही मौन
लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेकडे असल्यामुळे शिवसेना शिंदे गट या जागेवर आपला दावा सांगेल अशी अपेक्षा होती मात्र याबद्दलही शिवसेना शिंदे गटाची मंडळी बोलायला तयार नाहीत. नाही म्हणायला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख बळवंत जाधव यांनी लातूर शहर ग्रामीण मतदारसंघातून आपण योग्य दावेदार आहोत, आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र माझ्यापेक्षा भाजपकडे प्रबळ उमेदवार असेल व तो विजयी होऊ शकत असेल तर माझी आडकाठी असणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ठाकरे गट असो की शिंदे गट यांची भूमिका फारशी आक्रमक नसल्याचे दिसते.