सुहास सरदेशमुख
ओबीसी नेतृत्वात फूट पाडत पंकजा मुंडे यांचे भाजपमध्ये खच्चीकरण केले जात असून यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा आरोप करत आता समर्थकांनी ‘ होय आम्ही नाराज आहोत’ असे शीर्षक असणारी एक लाख पत्रे पक्षअध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडे ई-मेलसह पाठविण्याची तयारी केल्याने या मोहिमेतून भाजपच्या प्रदेश नेतृत्वावर अविश्वास व्यक्त करण्यात येत असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर याबाबत पंकजा मुंडे यांच्या मौनामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
पाथर्डी येथील सुभाष केकान यांनी ही मोहीम सुरू केली आहे. औरंगाबाद येथेही पत्रकार बैठका घेऊन पंकजा समर्थक आक्रमक झाले आहेत. तत्पूर्वी भाजप कार्यालयात घोषणाबाजी व नासधूस करत तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयापर्यंत जात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आता राज्यस्तरीय नेतृत्वाचा विरोधात आघाडी उघडली आहे. या सर्व घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आता राेहटादेवी येथे जाणार आहेत. आक्रमक कार्यकर्त्यांना काहीही न म्हणता त्यांचे मौन कायम असल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
ओबीसीच्या नेत्या अशी पंकजा मुंडे यांची प्रतिमा त्यांच्या वडील व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून जशास तशी पुढे चालत आली. त्यांनी ती प्रतिमा जपताना नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात फळी बांधण्यात पुढाकार घेतला. जलसंधारण खात्याच्या मंत्रीपदाचा कार्यभार काढून घेतल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काम केले. मात्र, बीड जिल्ह्यात कार्यक्रमाचा सूर सरकारमधील प्रमूख नेत्याच्या विरोधात राहील, असे वक्तव्य त्या करत होत्या. नाव न घेता व्यक्त होणारा सूर कार्यकर्त्यांनी पकडला आणि समाजमाध्यमांमधून फडणवीस यांच्या विरोधात टिप्पणी होत राहिली. आता कार्यकर्ते थेट विरोधी सूर लावत असून डाॅ. भागवत कराड, रमेश कराड यांना मिळालेली संधी ही पंकजा मुंडे याच्या नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचा भाग असल्याचा आरोप आता थेटपणे केला जात आहे.
पंकजा मुंडे यांनी माळी, धनगर, वंजारी, बंजारा व नाभिक अशी ‘माधवबन’ ही पक्ष विरहित संघटना बांधावी, असे आवाहनही ओबीसी व भटके विमुक्त संघर्ष समितीचे अध्यक्ष व निमंत्रक खुशाल मुंडे यांनी नुकतेच केले. राजकीय आकसापाेटी पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत असल्याचा कायकर्त्यांचा आरोप आहे. पाथर्डी येथील कार्यकर्ते सुभाष केकान यांनी पत्रे पाठविण्याचे मोहीम हाती घेतली असून त्यांनी समाजमाध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष व भाजप कार्यालयाचे ई- मेल पत्ते देत नाराज आहोत हे कळवा असे आवाहन केले आहे. पंकजा मुडे यांचे समर्थक आक्रमक असून आता रोहटादेवी दर्शनाच्या निमित्ताने त्या कोणती भूमिका व्यक्त करतात, याविषयी तर्क-वितर्क लढविले जात आहेत.