सुहास सरदेशमुख
औरंगाबाद: ‘आनंदाचा शिधा’ पोहोचलाच नसल्याची तक्रार शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर रविवारी पीक पाहणी दौऱ्यात झाली, तेव्हा कृषिमंत्र्यांच्या सिल्लोड मतदारसंघात ‘आनंदाचा शिधा’ मोफत देण्याची धावपळ सुरू झाली. जेवढ्या शिधापत्रिका तेवढी रक्कम प्रत्येकी शंभर रुपये दराने मंत्री सत्तार यांनी पुरवठा विभागात भरली आणि ‘आनंदाचा शिधा’ मोफत वाटप केला. गरिबांची दिवाळी ‘सत्तार सेठ’ यांच्यामुळे गोड झाली हे सांगायला अब्दुल सत्तार मित्रमंडळाचे कार्यकर्ते खास फिरत होते. साखर, रवा, हरभरा डाळ आणि तेल या चार वस्तू मोफत दिल्याचा प्रचार करत मंत्री सत्तार यांनी ‘तुम्हारे खत में हमारा सलाम’ हे त्यांच्या बोलण्यातील चार शब्द जशास तसे अमलात आणल्याची चर्चा सिल्लोड मतदारसंघात रंगली आहे.
शिवसेनेतील बंडाळीनंतर ‘पन्नास खोके एकदम ओके’ हे जणू घोषवाक्य व्हावे अशी परिस्थिती ग्रामीण भागातही निर्माण झाली होती. या चर्चेमुळे मतदारसंघात मोठे मेळावे घेण्यापासून ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शक्तीप्रदर्शनही घडवून आणण्यात आले. अब्दुल सत्तार यांच्या शक्तिप्रदर्शनात तर मतदार हे एवढे आपल्या बाजूचे आहेत की ‘कुत्ता’ चिन्ह दिले तरी आपण निवडून येऊ शकतो, असे अब्दुल सत्तार यांनी आपल्यालासांगितले होते, असा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मतदारांची हीन शब्दाने हेटाळणी होत असल्याने हा शब्द उच्चारावा की नको याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही साशंक होते. मात्र, जाहीर सभेतील तो उल्लेख अभिमानाचा वाटावा असा मिरविल्यानंतर मंत्री सत्तार यांनी पुरवठा विभागाची ‘आनंद शिधा’ ही योजनाच स्वत:च्या प्रचारासाठी वापरण्यास सुरुवात केली. शिधाधारकाने शंभर रुपये भरून शिधा घ्यावा, अशा सूचना होत्या. ही रक्कम मंत्री सत्तार यांनी भरल्याचा अब्दुल सत्तार मित्रमंडळाचा दावा आहे. शिधापत्रिकाधारकांना मोफत शिधा देण्याच्या उपक्रमाचे छायाचित्रही आता समाजमाध्यमांवर फिरत आहे.
हेही वाचा : निवडणूक अजून लांब मग दिवाळीत खर्च कशाला? कोल्हापुरातील नेत्यांचे धोरण
ग्रामीण भागात कृषी संकट अधिक तीव्र होत असताना दिवाळीत ‘आनंद शिधा’च्या माध्यमातून राजकीय पेरणी केली जात आहे. पुरवठा विभागाच्या माध्यमातून उत्तम मतदारबांधणी होते हे उत्तर प्रदेश निवडणुकीतून पुढे आल्यानंतर आता राज्यातही हे प्रारूप जोर धरू लागले आहे. सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात चार लाख ६२ हजार ६२६ शिधापत्रिकाधारक आहेत. त्या प्रत्येकापर्यंत आता ‘मी एकनाथ शिंदे समर्थक’ लिहिलेले किट आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमा असणारा शिधा आता पोहोचला आहे. कोणत्याही निवडणुका जाहीर नसताना राज्य सरकार सतत निवडणूक वातावरण कायम राहील असे वातावरण निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया राजकीय पटलावर उमटू लागली आहे.