Who is BJP face for Delhi poll campaign: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका आटोपल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. मागच्या दोन विधानसभेत मोठा पराभव सहन करावा लागल्यानंतर भाजपाकडून यंदा विधानसभा काबीज करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच भाजपा दिल्ली निवडणुकांसाठी प्रचाराचा चेहरा देणार असल्याची माहिती भाजपामधील अंतर्गत सूत्रांकडून मिळत आहे. द इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून पराभूत झालेल्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि दिल्लीतील सात लोकसभेतील खासदारांपैकी प्रवीण खंडेलवाल, कमलजीत सेहरावत, मनोज तिवारी आणि बांसुरी स्वराज यांच्यापैकी एकाकडे निवडणुकीच्या प्रचाराची कमान देण्यासाठी सध्या चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान मोदींनंतरचा दुसरा नेता जाहीर करणार?
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, स्मृती इराणी किंवा इतर नेत्याला निवडणुकीचा प्रचारप्रमुख करण्याबाबत संघटनेत विचार सुरू आहे. राष्ट्रीय नेतृत्व यावर अंतिम निर्णय लवकरच घेईल. तसेच दिल्लीतील सात खासदारांपैकी एखादा लोकप्रिय चेहरा, जो विधानसभेत विजय मिळवून देईल, अशा एखाद्या नेत्याचा चेहराही निवडणुकीसाठी घोषित केला जाऊ शकतो. जर तो खासदार विधानसभेला मुख्यमंत्री म्हणून निवडला गेला तर त्याचा लोकसभा मतदारसंघ एखाद्या माजी केंद्रीय मंत्र्याला दिला जाऊ शकतो.
मात्र, भाजपाच्या काही नेत्यांनी याबाबत दुमत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते जर मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचाही चेहरा जाहीर केला तर तो दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचा भाजपामधील दुसरा सर्वात मोठा नेता ठरेल. भाजपामधील एका नेत्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, मंगळवारी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली, तसेच एकाच चेहऱ्यावर दिल्ली विधानसभा निवडणुका लढविल्या जाव्यात याबाबत अनेकांनी सहमती दर्शविल्याची माहिती मिळत आहे. जर का असे झाले तर २०१५ नंतर असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ असेल.
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन दिल्लीचे मुख्यमंत्रिपद मंत्री आतिशी सिंह यांच्याकडे दिल्यानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री, संघटन सरचिटणीस बीएल संतोष आणि राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या काही निवडक नेत्यांची बैठक पार पडली. पुढील काही दिवसांत राजस्थानमधील रणथंबोर येथे भाजपाची संघटनात्मक बैठक होणार आहे. दिल्ली निवडणुकीच्या प्रचारासाठी योग्य चेहरा निवडणे, या विषयावर नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली. तसेच रणथंबोरच्या बैठकीत यावर अंतिम मोहोर उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे, अशी माहिती भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दिली.
हे वाचा >> Who is Atishi: दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवड झालेल्या आतिशी कोण आहेत?
किरण बेदी यांचा चेहर जाहीर करण्याचा निर्णय फसला
गेल्या काही वर्षांत भाजपा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याचे टाळत आले आहे. याचे कारण म्हणजे देशात कुठेही निवडणुका असल्या तरी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करूनच लढविल्या जात आहेत. दिल्लीत २०१५ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने माजी महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा चेहरा जाहीर केला होता. मात्र, त्या निवडणुकीत भाजपाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागांवर आम आदमी पक्षाचा विजय झाला, तर भाजपाच्या वाट्याला केवळ तीन जागा आल्या होत्या. ज्यांना मुख्यमंत्री करायचे होते, त्या किरण बेदी यांचाही दिल्लीच्या कृष्णनगर विधानसभेतून ‘आप’च्या एस. के. बग्गा यांच्याकडून पराभव झाला.
दिल्लीतील खासदारालाही प्रमुख चेहरा घोषित करण्याची शक्यता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील एखाद्या खासदारालाही पुढे केले जाऊ शकते. संघटन आणि निवडणुकीचा प्रचार अशी दुहेरी जबाबदारी यानिमित्ताने खासदाराकडे देता येऊ शकते. हे करताना संबंधित खासदाराच्या जात आणि समाजाचे प्रतिनिधित्व विचारात घेऊन निर्णय घेतला जाऊ शकतो. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, खासदाराला प्रमुख चेहरा म्हणून निवड करत असताना त्याचा जातसमूह, त्या समाजाची ताकद आणि खासदाराची लोकप्रियता हे निकष पाहिले जाऊ शकतात. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा निवडणुका झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात भाजपाकडून दिल्ली संघटनेत महत्त्वपूर्ण बदल केले जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीच्या सातही खासदारांना वैयक्तिक सूचना देऊन दिल्ली विधानसभा प्रचाराची तयारी आणि लोकसभेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. यंदा दिल्लीतील सातपैकी सहा मतदारसंघात नवीन खासदार प्रथमच निवडून आलेले आहेत.