या वर्षाच्या शेवटी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक लक्षात घेता भाजपाने येथे प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपाचे केंद्रीय नेते हिमाचल प्रदेशला सातत्याने भेट देत असून या निवडणुकीसाठी वातावरण तयार केले जात आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी शिमलामधील रामपूर येथे ‘नारी को नमन’ या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. या कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर सडेतोड टीका केली. इराणी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद, भारत जोडो यात्रा तसेच विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने जनतेला लाभापासून तसेच सोईसुविधांपासून वंचित ठेवले. तर भाजपातर्फे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासात्मक कामे केली जात आहेत, असे इराणी म्हणाल्या.
हेही वाचा >>> शिवसेनेने निमंत्रण दिल्यास राष्ट्रवादीचे नेते दसरा मेळाव्याला जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
भाजपा सरकारच्या काळात देशभरात एकूण ११ हजार शौचालये बांधण्यात आली. यातील २ लाख शौचालये एकट्या हिमाचल प्रदेशमध्ये बांधली गेली. देशातील महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे आहेती की नाही? याची काँग्रेसला चिंता नाही. काँग्रेसने अटल बोगद्याचे कामही पूर्ण केले नाही. भाजपाने या बोगद्याचे काम पूर्णत्वास नेले, असे म्हणत काँग्रेस अकार्यक्षम असल्याचा दावा इराणी यांनी केला.
हेही वाचा >>> प्रत्यक्ष कर संकलनात २३ टक्क्यांनी वाढ, ७ लाख कोटींची करआकारणी
तसेच हिमाचल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मागील अनेक वर्षांपासून हिमाचल प्रदेश विकासापासून वंचित आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये जयराम ठाकूर यांनी एकत्रित काम केल्यामुळे हिमाचल प्रदेशचा विकास होत आहे. भाजपाकडून विकासाची कामे केली जात आहेत. तर काँग्रेस सध्या आराम करत आहे, असे इराणी म्हणाल्या.
हेही वाचा >>> NIA ची मोठी कारवाई! तब्बल २३ पथकांची आंध्र प्रदेश, तेलंगाणामध्ये छापेमारी; PFIच्या सदस्यांना घेतले ताब्यात
पुढे बोलताना इराणी यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. आमच्या पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत, असे खुद्द काँग्रेसचे कार्यकर्ते विचारत आहेत. भारताचे तुकडे-तुकडे होतील असे म्हणणाऱ्यांसोबत काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रा काढत आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसीवरही गांधी परिवाराने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, अशी टीका स्मृती इराणी यांनी केली.
हेही वाचा >>> पंजाब : चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक, खळबळजनक घटनेनंतर विद्यार्थिनी आक्रमक
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंडी येते युवकांच्या सभेला संबोधित करणार आहेत.