तेलगू देशम पार्टीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर २०२४ च्या निवडणुकीत त्यांचा पक्ष विजयी झाला नाही, तर ही त्यांची शेवटची निवडणूक असेल. कुरनूल येथील एका रोड शो दरम्यान त्यांनी हे विधान केलं.
भाषण करताना काहीसे चंद्रबाबू नायडू भावूक झाले होते. त्यांनी ‘टीडीपी’ सत्तेत येईपर्यंत विधानसभेत पाय न ठेवण्याच्या त्यांच्या निर्धाराची यावेळी आठवण केली. नायडू म्हणाले, “जर मला विधानसभेत जायचे आहे, जर मला राजकारणात राहायचे आहे आणि जर आंध्र प्रदेशसोबत न्याय करायचा आहे. तर तुम्हाला टीडीपीला विजयी करावं लागेल. जर आगामी निवडणुकीत तुम्ही आम्हाला विजयी केलं नाही तर ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक ठरू शकते.” याचबरोबर, “नायडू यांनी उपस्थित जनसमुदायास तुम्ही मला आशीर्वाद देणार का?, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का?” असेही विचारले.
हेही वाचा – विश्लेषण : अहिर सुमदाय भारतीय सैन्यात स्वतंत्र रेजिमेंटची का करत आहे मागणी?
वायएसआर काँग्रेसवर टीका –
याशिवाय नायडू यांनी यावेळी सत्ताधारी वायएसआर काँग्रेसवरही टीका केली. नायडूंनी आरोप केला की, “वायएसआर काँग्रेसने विधानसभेत माझ्या पत्नीचा अपमान केला. तेव्हाच १९ नोव्हेंबर २०२१ पासून सत्तेत आल्यानंतरच आंध्र प्रदेश विधानसभेत पाय ठेवणार असल्याची मी शपथ घेतली होती. जर मी पुन्हा सत्तेत आलो नाही तर पुढील निवडणूक माझी शेवटची निवडणूक असेल. मी केवळ बिघडलेल्या गोष्टी ठीक करेन आणि राज्याला विकासाच्या मार्गावर परत आणेण व भविष्यात हे दुसऱ्यांच्या हवाली करेन.”
राज्याच्या भविष्यासाठी माझी लढाई –
चंद्रबाबू पुढे म्हणाले, “माझी लढाई मुलांच्या भविष्यासाठी, राज्याच्या भविष्यासाठी आहे. ही फार मोठी गोष्ट नाही हे मी या अगोदरही केले आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे एक मॉडल आहे. याबाबत विचार करा, जर मी म्हणतोय ते खरं वाटत असेल तर मला सहकार्य करा.”