सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी एकीकडे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये एकमेकांच्या विरोधात जोरदार रस्सीखेच सुरू असताना दोन्हीकडील घटक पक्षांमध्येही जागा वाटपासाठी संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपमध्येही उमेदवारीसाठी शह-प्रतिशहाचे राजकारण वाढल्याचे सोलापुरात दिसून येते. विशेषतः भाजपाचा गड असलेल्या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात सलग पाचव्यांदा आमदारकीची तयारी करणारे माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांचा पत्ता कापण्यासाठी पक्षांतर्गत विरोधकांनी पर्यायी नेतृत्वाचा डाव टाकला आहे. यात पर्यायी नेतृत्व म्हणून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ फौजदारी वकील मिलिंद थोबडे यांच्यासह माजी महापौर शोभा बनशेट्टी यांची नावे रेटली जात आहेत.
विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून २००४ पासून सलग चौथ्यांदा विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. २०१४ ते २०१९ पाच वर्षांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यकाळात आमदार देशमुख हे सोलापूरचे पालकमंत्री होते. १९९९ सालचा एक अपवाद वगळता १९९० पासून या मतदारसंघात भाजपने वर्चस्व राखले आहे. यात प्रामुख्याने वीरशैव लिंगायत आणि विणकर पद्मशाली या दोन समाजाचा भक्कम आधार भाजपने टिकवून ठेवला आहे. आमदार विजयकुमार देशमुख हे वीरशैव लिंगायत समाजातील बडे प्रस्थ मानले जातात. शहराचा गावठाण भाग असलेल्या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात गेल्या वीस वर्षात आमदार विजयकुमार देशमुख यांना पक्षांतर्गत अन्य पर्याय आला नाही. त्यामुळे मतदार संघात विकासकामे, प्रशासनावर पकड, जनसंपर्क हे मुद्दे बाजूला पडले आहेत.
हेही वाचा : “लॉरेन्स बिश्नोई व केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीतरी शिजतंय”, पंजाब काँग्रेसचा गंभीर आरोप!
तथापि, भाजपने गेली दहा वर्षे देशात आणि राज्यात सत्ताकारण करताना सोलापुरात आपली ताकद वरचेवर भक्कम करीत सोलापूर महापालिकेसह अन्य सत्तास्थाने काबीज केली होती. दहा वर्षे खासदारकीही टिकवून ठेवली होती. याच दरम्यान पक्षात गटबाजीला ऊत आला. त्यातून आमदार विजयकुमार देशमुख विरूद्ध सोलापूर दक्षिणचे आमदार, माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्यातील छुपा संघर्ष अधुनमधून चव्हाट्यावर येतो.
या पार्श्वभूमीवर इकडे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासमोर पक्षांतर्गत दुसरा पर्याय आणला जात आहे. पाच वर्षांपूर्वी विष प्रयोगामुळे चर्चेत आलेले सोलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी माजी महापौर शोभा बनशेट्टी त्यांच्याशी दिलजमाई करून आमदार विजयकुमार देशमुख यांच्याविरुद्ध पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. माजी महापौर शोभा बनशेट्टी या वीरशैव लिंगायत समाजातून पुढे आल्या आहेत. त्यांना माहेर आणि सासरचा राजकीय वारसा लाभला आहे. अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे त्यांचे वडिल आहेत. तर काँग्रेसचे पण हिंदुत्ववादी म्हणून ओळखले गेलेले आणि सोलापूर नगरपालिका व महापालिकेत तब्बल ५० वर्षे प्रतिनिधित्व केलेले दिवंगत माजी महापौर विश्वनाथप्पा बनशेट्टी हे शोभा बनशेट्टी यांचे आजे सासरे होत. महापौरपदी असताना शोभा बनशेट्टी यांना सत्ताधारी भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे सतत त्रास सहन करावा लागला होता. यातून त्यांचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर कधीही पटले नव्हते.
हेही वाचा : AIMIM चा महाविकास आघाडीत शिरण्याचा प्रयत्न; पण काँग्रेसकडून सावध भूमिका, कारण काय?
या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांना पुन्हा संधी न देता इतरांचा विचार व्हावा म्हणून त्यांच्या विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी दुसरा पर्याय म्हणून शोभा बनशेट्टी यांच्या रूपाने महिलेला संधी मिळावी असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आला असून त्याशिवाय आणखी एक पर्याय म्हणून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ फौजदारी वकील मिलिंद थोबडे यांचेही नाव पुढे आले आहे. शोभा बनशेट्टी आणि मिलिंद थोबडे हे दोघेही वीरशैव लिंगायत समाजातील प्रतिष्ठित घराण्यातील समजले जातात. विशेषतः अॅड. मिलिंद थोबडे हे सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी शेटे घराण्याचे वारसदार, वतनदार आणि जमीनदार आहेत. लिंगायत समाजासह अन्य समाजातही त्यांचा संपर्क आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शोभा बनशेट्टी, अॅड. मिलिंद थोबडे यांच्यासह इतरांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन, आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्यावी म्हणून त्यांना साकडे घातले आहे. या निमित्ताने आमदार विजयकुमार देशमुख यांचे सर्व विरोधक एकत्र आल्याचे दिसून येते.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख हे कोणतेही भाष्य न करता छुप्या पद्धतीने प्रतिडाव टाकत आहेत. लिंगायत समाजासह पद्मशाली तसेच वडार, नवबौद्ध, मराठा, भोई, क्षत्रिय आदी विविध समाज घटकांची बांधणीसह साम, दाम, दंड, भेद नीतीमध्ये ते माहीर समजले जातात.