सोलापूर : अडीच वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना मोठी फूट पडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा गट तयार होऊन सत्तेत आला आणि बलदंड झाला. त्यानंतर अधुनमधून शिवसेना ठाकरे पक्षाला राज्यात कोठे ना कोठे भगदाड पडत राहिले असताना त्याचे लोण आता सोलापूर जिल्ह्यातही पसरले आहे. माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार रतिकांत पाटील, त्यांचे पुत्र तथा पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव या जुन्या जाणत्या मंडळींनी अचानक घडलेल्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठा बाजूला ठेवून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. आणखी काहीजण ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याच्या बेतात आहेत. या सर्व घडामोडी पाहता सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गट कमकुवत झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकेकाळी सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेने स्वतःची ताकद निर्माण करून तब्बल चार आमदार निवडून आणले होते. उत्तमप्रकाश खंदारे (उत्तर सोलापूर राखीव), जयवंत जगताप (करमाळा), राजेंद्र राऊत (बार्शी) आणि रतिकांत पाटील (दक्षिण सोलापूर) अशा चार आमदारांच्या बळावर शिवसेनेने एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात वैभव प्राप्त केले होते. शिवशरण पाटील-बिराजदार आणि ॲड. शहाजीबापू पाटील हेही आमदार झाले. परंतु हे वैभव पुन्हा कधीच टिकवून ठेवता आले नाही. जुन्या-नव्यांचा संगम निर्माण करता आले नाही. उलट, पक्षाने ज्यांना जबाबदारीची पदे दिली, त्यांनी पक्षात एकी न राखून पक्ष संघटना बळकट करणे अपेक्षित होते. झाले उलट, पक्षात बेदिली फोफावत गेली.
सोलापुरात १९८०-८२ च्या सुमारास शिवसेनेने पाय रोवल्यायानंतर पक्षाचे तत्कालीन जिल्हा संपर्कप्रमुख राम भंकाळ, लीलाधर डाके, शरद आचार्य, त्यानंतर सीताराम दळवी, खासदार अरविंद सावंत, विलास भानुशाली आदींनी पक्षाची पाळेमुळे रुजविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यांना त्यावेळी साईनाथ अभंगराव, मनोहर वाघचवरे, प्रा. सुधीर पुरवंत, ॲड. शिवाजी मांगले, पुरूषोत्तम बरडे, धनंजय डिकोळे, दीपक गायकवाड, पंडित देशमुख, सुभाष देशमुख, दत्ता भोसले, रमेश जोशी इत्यादी शिवसैनिकांनी चिवटपणे साथ दिली होती. पक्षाचे काम करताना तत्कालीन प्रस्थापितांना अंगावर घेतल्यामुळे काही शिवसैनिकांना जीव गमवावा लागला. तर कोणी जायबंदी झाले. तर कोणाची आर्थिक कोंडी झाली.

कालानुरूप राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर शिवसैनिकांचे जीवनमान बदलत गेले. विशेषतः त्यातील काहीजणनी आश्रमशाळा, वृध्दाश्रम, कंत्राटी कामे, वाळू वाहतुकीपासून ते टोल वसुलीपर्यंत स्वतःला गुंतवून गब्बर झाले. एव्हाना, पक्ष संघटना मजबूत करण्याकडे दुर्लक्ष झाले. उत्तमप्रकाश खंदारे हे तीन वेळा आमदार झाले. मंत्रिपद उपभोगले. परंतु चंद्रकांत खैरे, बबनराव घोलप यांच्याप्रमाणे पक्षाच्या मुख्य प्रवाहात राहून त्यांनी नवीन जबाबदाऱ्या सांभाळणे अपेक्षित होते. परंतु त्यांचे कार्याचे वर्तुळ वेगळेच राहिले. कुर्डूवाडी व बार्शी या महत्त्वाच्या शहरांत शिवसेनेने चांगले बस्तान बसवून मोठा प्रभाव निर्माण केला होता. बार्शीचे शिवाजीराव कांबळे हे तत्कालीन धाराशिव लोकसभा राखीव मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. बार्शीत माजी आमदार राजा राऊत हे मोठे झाले. अशा प्रकारे जिकडे तिकडे नेते मोठे झाले आणि पक्ष मात्र मोठा न होता छोटाच राहिला.

इकडे सोलापुरात माजी महापौर महेश कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा लढविली आणि महापालिकेत स्वतःच्या ताकदीवर २१ नगरसेवक निवडून आणले. परंतु पक्षात त्यांना सांभाळून ठेवण्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांना अपयश आले. त्याचा परिणाम पक्षालाच भोगावा लागला.या पार्श्वभूमीवर अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठी पडून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र स्वतःचा मोठा गट निर्माण केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात काही अपवाद वगळता ठाकरे गट स्थिर राहिला होता. परंतु अलिकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तर ठाकरे गटात ‘अर्थ’पूर्ण व्यवहार वाढले. यातच शहरप्रमुख गुरू शांत धुत्तरगावकर, विष्णू कारमपुरी यांनी पक्षापासून स्वतः ला दूर ठेवले.

स्थानिक नेत्यांनी थोडेसे मनावर घेतले असते तर धुत्तरगावकर, कारमपुरी यासारखी मंडळी पक्षात कायम राहिली असती. जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या बैठकीत खुर्च्यांची फेकाफेक होऊन वाईट संदेश दिला गेला. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आपली मोहीम फत्ते करीत ठाकरे गटाला मोठे भगदाड पाडण्यात यश मिळविले. ही पडझड रोखून धरण्याची मोठी जबाबदारी स्थानिक नेत्यांसह जिल्हा संपर्कप्रमुखांची होती. आगामी सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होण्याची अपेक्षा आहे‌. त्यादृष्टीने ठाकरे गट आपले गलितगात्र झालेले अस्तित्व कितपत टिकवून ठेवतो, याबाबत राजकीय वर्तुळात शंका व्यक्त होत आहे.