सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निश्चित झाला नसताना दुसरीकडे काँग्रेसची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून आमदार प्रणिती शिंदे यांनी संपूर्ण मतदारसंघात गावभेटीच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावला आहे. परंतु त्यांना मराठा आरक्षण आंदोलकांच्या माध्यमातून काही गावांमध्ये रोखण्याचे प्रकार सुरू आहेत. यातच भर म्हणून एका गावात त्यांच्या मोटारीवर हल्ल्याचा प्रयत्न होऊन गोंधळ झाला. यात त्यांनी मराठा आरक्षण आंदोलकांच्या आडून भाजपनेही हे कट कारस्थान रचल्याचा आरोप केला. या राजकीय आरोपामुळे बिथरलेल्या भाजपने आमदार प्रणिती शिंदे यांना घेरण्याच्या दृष्टीने डावपेच आखायला सुरुवात केली आहे. यात सकल मराठा समाजाला ओढण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे त्यातून सोलापुरातील राजकारण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा २०१४ आणि २०१९ साली सलग दोनवेळा दारूण पराभव झाला होता. त्याअगोदर २००४ साली सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा सोलापूर लोकसभा निवडणुकीत (२००४) तेवढाच धक्कादायक पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची शक्ती बऱ्याच अंशी घटलेली असताना सुशीलकुमारांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यंदा लोकसभेच्या रणांगणात उतरल्या आहेत. तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या तसेच सोलापूर लोकसभा निवडणुकीत त्याच भाजपच्या उमेदवार राहणार असल्याच्या वावड्या बरेच दिवस उठल्या होत्या. परंतु अखेर त्यांनी काँग्रेसकडूनच निवडणूक रिंगणात उतरून प्रचारही सुरू केला आहे. दुसरीकडे भाजपमध्ये इच्छुकांच्या भाऊगर्दीत नेमका उमेदवार कोण, याची सार्वत्रिक उत्सुकता कायम आहे.
हेही वाचा – विखे-पाटील यांच्या माफीनाम्यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम
लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहात असताना मराठा आरक्षण आंदोलकांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करून हुसकावून लावण्याचे प्रकार माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात तुरळक प्रमाणात का होईना, सुरू आहेत. गेल्या महिन्यात सोलापुरात सकल मराठा समाजाच्या आंदोलक कार्यकर्त्यांनी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या तिघा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर जाऊन निदर्शने केली होती. त्यावेळी मुंबईत असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे स्पिकर चालू करून बोलताना गैरसमजामुळे वाद झाला होता. खरे तर तेथूनच आमदार प्रणिती शिंदे मराठा आरक्षण विरोधक कशा आहेत, याबद्दल वावड्या उडविण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर अलिकडे लोकसभेची उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच आमदार प्रणिती शिंदे मतदारसंघात संवाद भेट आणि गाव भेटीच्या माध्यमातून फिरू लागल्या असता मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर आदी भागात तीन-चार गावांमध्ये मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांना रोखले. भाजपचे वर्चस्व असलेल्या एक-दोन गावांमध्ये असे प्रकार घडले.
हेही वाचा – मुलाच्या ‘कल्याणा’साठी मुख्यमंत्र्यांचे सारे काही
एका गावामध्ये मराठा आरक्षण मुद्यावर कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळत नसल्याची सबब पुढे करण्यात आली असता आमदार प्रणिती शिंदे यांनी जागेवरच संबंधित प्रांताधिकाऱ्यांना थेट भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून खडे बोल सुनावले. त्यातून मराठा आंदोलकांनी समाधान व्यक्त केल्याचा प्रकार घडला होता. पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात रात्री आमदार प्रणिती शिंदे यांना पुन्हा मराठा आरक्षण आंदोलकांना सामोरे जावे लागले. मात्र त्यावेळी गोंधळ होऊन त्यांच्या मोटारीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मराठा आरक्षण आंदोलकांच्या आडून भाजपवाल्यांचे हे कट कारस्थान असल्याचा थेट आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आणि एका महिला आमदाराच्या मोटारीवर मराठा आंदोलक नव्हे तर त्यांच्या आडून भाजपचे गुंडच हल्ला करू शकतात, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
या घटनेनंतर भाजपचे स्थानिक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेले आरोप फेटाळत त्यांना प्रतिआव्हान दिले. आपला आरोप प्रणिती शिंदे यांनी सिद्ध करावा, अन्यथा मतदारसंघात त्यांना कोठेही फिरणे मुश्कील करू, असा इशाराही भाजपने दिला आहे. दुसरीकडे भाजपशी ममत्व असलेल्या काही मराठा कार्यकर्त्यांनीही आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे पंढरपुरातील घटनेबद्दल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी, प्रणिती शिंदे यांच्या मोटारीवरील हल्ल्याचे आपण समर्थन करणार नाही, असे स्पष्ट केले.