सोलापूर : लोकसभा निवडणुकीत सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडून आल्यानंतर त्यांच्या हक्काच्या सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आतापासूनच दावेदारी सुरू झाली आहे. ही जागा लढण्यासाठी इच्छुक असलेले माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी महाविकास आघाडीचा निर्णय होण्यापूर्वीच स्वतःची उमेदवारी गृहीत धरून ‘व्होट भी दो और नोट भी’ अभियान सुरू केले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देताना त्यांनी यापूर्वी सलग तीनवेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा स्वतःला मिळण्यासाठी माकपचे आडम यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून शब्द घेतल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन हक्क सांगितला आहे. लवकरच आपण माकपचे नेते सीताराम येचुरी यांच्या मार्फत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार असल्याचे आडम सांगतात. याबाबत माकपच्या पॉलिट ब्युरोकडून जो निर्णय होईल, तो आपणांस मान्य राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – काँग्रेसने मणिपूरमध्ये १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे मोदींचे वक्तव्य; काय आहे इतिहास?

या पार्श्वभूमीवर नरसय्या आडम यांनी पक्ष कार्यकर्त्यांचा कौल घेण्यासाठी मेळावा आयोजिला असता त्यात शहर मध्य विधानसभेची जागा लढविण्याचा आग्रह आडम यांना केला गेला. एवढेच नव्हे तर याच मेळाव्यात ‘व्होट दो और नोट भी’ अभियान लगेचच सुरूही करण्यात आले. तेव्हा मेळाव्यातून या अभियानाला प्रतिसाद देत कामगार व कार्यकर्त्यांनी ४० हजार रुपयांची रक्कम गोळा करून आडम यांना सुपूर्द केली.

या मेळाव्यात आडम यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविण्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जाहीरनामाही घोषित करून टाकला. आडम हे यापूर्वी १९९५ साली याच मतदारसंघाचा बहुसंख्य भाग राहिलेल्या तत्कालीन शहर दक्षिणमधून काँग्रेस व शिवसेनेला पराभूत करून निवडून आले होते. त्यानंतर २००४ साली काँग्रेसने ही जागा स्वतः लढविता माकपला नरसय्या आडम यांच्यासाठी सोडली होती. तेव्हा ते पुन्हा आमदार झाले होते.

एकीकडे आडम यांनी शहर मध्य विधानसभेची लगीनघाई सुरू केली असताना काँग्रेस पक्षातूनही खासदार प्रणिती शिंदे यांचा उत्तराधिकारी होण्यासाठी दावेदारी वाढली आहे. मोची समाजातून आलेले माजी महापौर संजय हेमगड्डी यांचे नाव पुढे आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तौफिक शेख, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्याचे ठरले आहे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात आपली डाळ शिजणार नसल्याचा कानोसा घेत याच पक्षाचे माजी महापौर महेश कोठे हेसुद्धा शहर मध्य विधानसभेवर डोळा ठेवून असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे काँग्रेसपुढे पेच निर्माण होण्याची शक्यता वर्ताविली जात आहे. यातच एमआयएम पक्षानेही ही जागा लढविण्यास त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – हिंदू धर्म ते मणिपूर! विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदींनी काय उत्तरे दिली?

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या घरच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रात भाजपने अपेक्षेपेक्षा जास्त मते घेऊन प्रणिती शिंदे यांना अवघ्या ७९६ मतांच्या आघाडीवर रोखल्यामुळे आता याच शहर मध्य विधानसभेसाठी भाजपने लोकसभेच्या पराभवाचे दुःख बाजूला ठेवून जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माळशिरसचे आमदार राम सातपुते कृतज्ञता मेळाव्याच्या नावाखाली कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यातून सातपुते यांना सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा लढविण्याचा आग्रह केला गेला. याच जागेसाठी जोरदार तयारी करणारे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे देवेंद्र कोठे यांनी मेळाव्यातील रागरंग पाहून राम सातपुते हे शहर मध्य विधानसभा लढविण्यास तयार असतील तर आपण शहर उत्तर विधानसभा लढविण्यास तयार आहोत, असे स्पष्ट केले.

सातपुते यांनीही शहर मध्य विधानसभेच्या जागेबाबत स्वतःचे पत्ते लगेचच न उघडता सावध पवित्रा घेतला आहे. माळशिरसमध्ये ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या कुटुंबीयांकडून पंगा घेतल्यामुळे सातपूते यांचा माळशिरस विधानसभा निवडणुकीत निभाव लागण्याची शक्यता धुसर मानली जाते. इकडे, भाजपचा मजबूत बालेकिल्ला ठरलेल्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे पराभूत राम सातपूते यांना ३५ हजार ९२७ एवढे सुरक्षित मताधिक्य मिळाले होते. याच पक्षाचे आमदार विजय देशमुख हे याच विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा प्रतिनिधित्व करीत असून पुन्हा पाचव्यांदाही त्यांचीच उमेदवारी शाबूत राहू शकते, असे राजकीय जाणकारांना वाटते. परंतु याच जागेवर देवेंद्र कोठे यांनीही हक्क सांगितल्यामुळे भाजपमध्ये उमेदवारी लिगायत समाजाला (आमदार विजय देशमुख) की पद्मशाली समाजाला (देवेंद्र कोठे) द्यायची, यावरून तिढा निर्माण शक्यता वर्तविली जात आहे.