एजाजहुसेन मुजावर
पोलीस खात्यात नोकरी मिळविण्यापासून ते खात्यात सेवा बजावताना २९ वर्षाच्या सेवाकाळात राजकीय दबावाने झालेल्या १६ बदल्या, सेवापुस्तिकेत आकसबुद्धीने मारलेले शेरे, त्याविरोधात केलेली प्रशासकीय आणि न्यायालयीन स्तरावरील लढाई, प्रशासनाची अनास्था आणि गळचेपीमुळे हुकलेली बढती, सातत्याने दुय्यम स्तरावर झालेल्या नेमणुका, असा संघर्ष करीत असताना दुसरीकडे निराश न होता प्रत्येकवेळी मिळालेल्या संधीचे सोने करीत कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल हे उद्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
पोलीस खात्यात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना बहुतांशी अधिकाऱ्यांना सत्ताधारी राजकीय नेते आणि प्रशासनातील वरिष्ठांच्या भ्रष्ट युतीमुळे त्रास सहन करावा लागतो. स्वाभिमान बाजूला ठेवून व्यवस्थेशी जुळवून न घेणाऱ्या अशा अधिकाऱ्यांकडे वक्रदृष्टीनेच पाहिले जाते. प्रगत महाराष्ट्रात अरविंद इनामदार यांच्यासारखे अधिकारी त्याचे ठळक उदाहरण ठरतात. त्यात हरीश बैजल यांचीही भर पडल्याचे दिसून येते.
हरीश मगनलाल बैजल हे १९९० साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपअधीक्षकपदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. इथपासून त्यांना सतत अन्यायाविरुद्ध लढा द्यावा लागला. राजकीय पुढाऱ्यांचा रोष ओढवून घेतल्याने झालेल्या बदल्या हे त्यांच्या दीर्घकाळातील बदल्यांचे वैशिष्ट्य. नुसत्या बदल्या करून त्यांच्यावरील राग व्यवस्थेने व्यक्त केला नाही, तर त्यांना योग्यवेळी मिळू शकणाऱ्या बढतीच्या वेळीही मोडता घालत, ती मिळू नये, यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. बैजल यांचे वेगळेपण असे, की राजकारण्यांपुढे नाक न घासता, यंत्रणेला शरण न जाता, प्रत्येकवेळी योग्य त्या न्यायपीठाकडे दाद मागितली. त्या प्रत्येकवेळी त्यांना न्याय मिळाला खरा, परंतु त्यामुळे खूप काळ जावा लागला. न्याय मिळाला आणि त्यामुळे झालेल्या बदल्या अन्यायकारक असल्याचे सिद्धही झाले.
सोलापूरमध्ये पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी शालेय मुलांना अनोखी इफ्तार पार्टी
हरीश बैजल यांनी ज्या ज्या पदावर काम केले, तेथे सर्वसामान्यांना न्याय कसा मिळेल, याचा वितार केला. मुंबईत काम करताना, हेल्मेट आणि सीटबेल्ट न वापरणाऱ्यांविरुद्ध त्यांनी मोहीमच उघडली. अगदी त्यावेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीही त्यातून सुटका झाली नाही. मोठ्या रस्त्यांवर दोन मार्गिका जड वाहनांना वापरू न देता हलक्या वाहनांसाठी त्यांनी मोकळ्या केल्या. रेती, खडी, माती वाहतूक करणाऱ्या मालमोटारींवर ताडपत्रीसारखे आच्छादन लावण्याची सक्ती केली. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या व्यक्तींना दंडासह सहा महिने असलेल्या शिक्षेच्या तरतुदीचाही त्यांनीच प्रथम वापर केला. नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम करताना वर्षाकाठी ४०-५० कारवायांमध्ये वाढ करत एकाच वर्षात १२४ लाचखोरांवर कारवाया केल्या.
बहुतांशी कार्यकाळ बिगर कार्यकारी नेमणुकांच्या म्हणजे दुय्यम दर्जाच्या ठिकाणीच जवळपास २२ वर्षे काढली. अखेरच्या टप्प्यात सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून अवघ्या आठ महिन्यांचा कालावधी मिळाला तरीही त्यांनी सोलापुरात संधीचे सोने करीत उठावदार काम केले. कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना दुसरीकडे विविध सामाजिक उपक्रमही त्यांनी राबविले. सुमार २० हजारे मुलांना चिमण्यांची घरटी वाटप करून चिमण्यांची घटणारी संख्या वाढविण्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न केला. तृतीयपंथीयांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न केले आणि पोलिसांच्या कुटुंबीयांनाही रोजगार मिळण्यासाठी कपडे उद्योगात प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. सतत लढाई करतानाही आपले स्वत्व जपत बैजल यांनी केलेले कार्य म्हणूनच लक्षात राहणारे ठरत आले आहे.