पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) पक्षाचा एकही आमदार नसताना लोकसभेची जागा जिंकली. आणि आता विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला आव्हान देत पुन्हा बालेकिल्ला काबीज करण्याचा प्रयत्न शरद पवार गटाचा आहे. तर एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मोडून काढून जिल्ह्यातील ११ जागांपैकी ५ ठिकाणी तर एका अपक्षाचा पाठिंबा मिळवत भाजपाने राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) पक्षाचा कणा मोडला होता. यंदा जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) आणि भाजपा ५ जागांवर निवडणूक लढत आहेत. भाजपाने विद्यामान ५ आमदारांना उमेदवारी दिली आहे. मात्र पंढरपूर, माळशिरस या ठिकाणी चुरशीची तर सोलापूर दक्षिणमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी तर शरद पवार गटाला पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी ही निवडणूक चुरशीची ठरणार असे चित्र आहे.
जिल्ह्यातील ११ विधानसभेसाठी सर्वच पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली. मात्र जिल्ह्यात विधानसभेचा एकही आमदार नसताना शरद पवार गटाकडे जाण्यासाठी भाजपाच्या नेत्यांना देखील मोह आवरला नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी होईल, असे चित्र होते. मात्र पवारांनी सध्या तरी परिस्थिती आटोक्यात ठेवण्यात यश मिळवले. लोकसभा निवडणुकीत जरांगे, आरक्षण, संविधान बदलणार असे काही मुद्दे भाजपा विरोधात गेल्याचे विश्लेषकांचे मत आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत आता हे मुद्दे तितकेसे उरलेले नाहीत. उमेदवार, स्थानिक प्रश्न अशा काही मुद्द्यांवरच ही निवडणूक निर्णायक होण्याची शक्यता आहे. भाजपाने विद्यामान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली.
हेही वाचा :‘पुणे पॅटर्न’चा शाप!
यंदा सोलापूर दक्षिण, पंढरपूर, माळशिरस या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. यातील दोन जागेवर भाजपा आणि शरद पवार गट अशी लढत आहे. विद्यामान आमदारांनी केलेली विकासकामे, मतदारांशी संपर्क या गोष्टी जरी भाजपाच्या पथ्यावर असल्या तरी भाजपाला मेहनत घ्यावी लागणार. उमेदवारांना महायुती आणि महाविकास आघाडीमधील सहकारी पक्ष किती मदत करणार यावरही बरेच गणित अवलंबून आहे. एकंदरीत जिल्ह्यात पुन्हा कमळ की तुतारी यात चुरस वाढली असून निकालाबाबत आतापासूनच चर्चेला उधाण आले आहे.