पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन केले होते. भगवंत मान प्रत्यक्ष लोकांना भेटून त्यांच्या अडचणी समजावून घेणार होते. स्वतः मुख्यमंत्री भेटणार म्हणून नागरिकांनी भरपूर गर्दी केली होती. यावेळी इथे जमलेल्या काही नागरिकांना आत जाण्यास परवानगी न मिळाल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरवातीला कार्यक्रमाच्या नावाचा गोंधळ आणि नंतर नागरिकांना आत जाण्यापासून अडवण्यात आले. एकूणच मान यांचा पहिला जनता दरबार हा वेगळ्याच कारणांसाठी गाजला.

नक्की काय घडलं?

आम आदमी पक्षातर्फे रविवारी जाहीर करण्यात आले होते की सोमवारी सकाळी मुख्यमंत्री भगवंत मान हे पंजाब भवन येथे सार्वजनिक दरबार घेणार आहेत. नंतर हे नाव बदलून ‘सार्वजनिक सुनावणी’ करण्यात आले. ऐनवेळी हे नाव पुन्हा बदलून याला ‘आप’ने ‘लोक मिलनी’ असे नाव दिले. नावात गोंधळ असतानाच पंजाब भवनाच्या गेट वर काही नागरिक आक्रमक होऊन घोषणाबाजी करताना दिसले. कारण कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांना यादीत नाव नसल्याचे कारण सांगत प्रवेश नाकारला. यावरून प्रवेश नाकारण्यात आलेले लोक आक्रमक झाले आणि घोषणा देऊ लागले. यावेळी आंदोलन करणाऱ्यांमध्ये आघाडीवर होते ते निवृत्त आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हरमनजीत सिंग. ते म्हणाले की “निवडणुकीच्या वेळी मान यांनी स्वतः फोन केला होता. ते मुख्यमंत्री झाले याचा मला सगळ्यात जास्त आनंद झाला होता. पण आता ते भेटत नाहीत. त्यांचे सचिवसुद्धा भेटू शकले नाहीत”.

या कारणामुळे लोकांना आला राग

चंदीगड येथील एका शेतकऱ्याने संगितले,  “मी शेतकऱ्यांच्या एका प्रश्नासाठी मान यांना भेटायला आलो होतो. मात्र, आम्हाला इथे गेटवरच अडवण्यात आले आहे. ज्यांनी आधी वेळ घेतली आहे त्यांनाच आत जाता येईल. काल रात्रीच या दरबाराची माहिती आम्हाला देण्यात आली. मग त्यांची आधी वेळ कशी घेणार? त्यामुळे ठराविक लोकांसाठी हा ‘पूर्वनियोजित स्टेज शो’ असल्याचा आरोप करत हा जनता दरबार नव्हता कारण मी जनता आहे मग मला का अडवण्यात आलं? असा प्रश्न या शेतकऱ्याने विचारला आहे.

राजकीय पार्श्वभूमी

पंजाबमध्ये फार मोठ्या सत्ता संघर्षानंतर आम आदमी पक्षाने बहुमत मिळवले आणि भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री झाले. निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधील पक्षांतर्गत सत्तासंघर्ष शिगेला पोचला होता. पक्षांतर्गत वादाचा फटका काँग्रेसला बसला आणि त्यांनी पंजाबमधील त्यांची सत्ता गमावली. कॉंग्रेसवर गेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी पंजाबच्या लोकांनी विश्वास ठेवला होता तो विश्वास पक्षांतर्गत कलहामुळे काँग्रेसने या निवडणुकांच्या वेळी गमावला. लोकांनी आम आदमी पक्षाच्या हातात सत्ता दिली आणि भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री झाले.

Story img Loader