काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून देशवासीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर चालण्याचे आवाहन केले. तसेच आज संविधान, देशातील स्वायत्त संस्था यावर वेगवेगळ्या मार्गाने हल्ला होत असून त्याच्या रक्षणाची गरज आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त टेलिग्राफ या दैनिकात एक विशेष लेख लिहिला. या लेखात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> कर्नाटकमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षविस्तार

देशातील मूल्ये नष्ट करण्याचा प्रयत्न

“देशाच्या राज्यघटनेचे यश हे देशातील लोकांवर अवलंबून आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे. सध्याचे सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. संविधानाला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कायद्याचा दुरुपयोग करून स्वातंत्र्यावर हल्ला केला जात आहे. सध्या देशभरातील लोक अर्थकारणाच्या दृष्टीने पिचले आहेत. मात्र सोईच्या आणि फायदा मिळवून देणाऱ्या मित्रांना विशेष सवलती देऊन समानतेचे तत्व पायदळी तुडवले जात आहे,” असे सोनिया गांधी म्हणाल्या.

कठीण काळात एकत्र येऊन लढले पोहिजे

“भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल अशा अनेक नेत्यांचे एकमेकांशी मतभेद होते. मात्र या सर्व नेत्यांमध्ये मतभेद असले तरी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी एकत्र काम केलेले आहे. त्यांच्यात मतभेद होते. मात्र ते सर्व नेते एकाच धेय्यासाठी लढत होते. त्यामुळे आपणही सर्वांनी अशा कठीण काळात एकत्र येऊन लढले पोहिजे,” असे सोनिया गांधी म्हणाल्या.

हेही वाचा >>कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

भारतीयांच्या रक्तात बंधुत्वाची भावना अजूनही जिवंत आहे

“मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करणारे सध्या खरे अँटी नॅशनल आहेत. धर्म, भाषा, जात, लिंगाच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडली जात आहे. मात्र असे प्रयत्न होत असले तरी भारतीयांच्या रक्तात बंधुत्वाची भावना अजूनही जिवंत आहे. आपण बंधुभावाच्या भावनेचा पुरस्कार केला पाहिजे. तसेच या भावनेवरील हल्ला रोखला पाहिजे,” असे आवाहान सोनिया गांधी यांनी केले.

सामाजिक न्यायाची संकल्पना जपण्याचे आव्हान

सध्या सर्वच क्षेत्रांचे वेगाने खासगीकरण केले जात आहे. यामुळे दलित, आदिवासी, ओबीसींना आर्थिक, सामाजिक सुरक्षणा देणारे आरक्षणदेखील कमी होत आहे. त्यामुळे सध्या बदलत्या काळात सामाजिक न्यायाची संकल्पना जपण्याचे आपल्यापुढे आव्हान आहे, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi criticises bjp urges indians to fight together prd