काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु होती. त्यावर आज काँग्रेसच्या यादीने शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे आता रायबरेली मतदारसंघातून प्रियंका गांधी या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या महिन्याच्या शेवटी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत राजस्थानमध्ये काँग्रेस तीनपैकी एक जागा जिंकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी तेलंगणा आणि कर्नाटकच्या आमदारांनी सोनिया गांधी यांना त्यांच्या राज्यातून राज्यसभेची निवडणूक लढण्याची विनंती केली होती. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे कर्नाटकचे आणि राहुल गांधी हे केरळचे खासदार असल्याचे सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे काँग्रेसमधील अंतर्गत सुत्रांनी सांगितले आहे.

हेही वाचा – नांदेड जिल्ह्यातील दोघांना खासदारकी ! ‘अपेक्षित’ अशोकराव, ‘अनपेक्षित’ डॉ. अजित गोपछेडे, पंकजा मुंडे यांच्या नावासमोर पुन्हा फुली

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी ज्यावेळी वायनाड आणि अमेठीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी विविध चर्चांना उधाण आले होते. तसेच या निवडणुकीत हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत राहुल गांधी स्वत: अमेठीतून पराभूत झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी पुन्हा अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर प्रियंका गांधी या सोनिया गांधी प्रतिनिधत्व करत असलेल्या रायबरेली मतदार संघातून निवडणूक लढवू शकतात.

सोनिया गांधी या १९९९ साली पहिल्यांदा अमेठीतून निवडून आल्या. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राजीव गांधी यांनीही देखील केले होते. दरम्यान, २००४ साली त्यांनी राहुल गांधींसाठी हा मतदार संघ सोडला आणि रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे रायबरेली या मतदारसंघातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही निवडणूक लढवली होती.

गांधी घराण्याचा दक्षिण भारताचा संबंध

राजकीय इतिहास बघितला, तर गांधी घराण्यातील सदस्यांनी आव्हानात्मक काळात दक्षिणेतील मतदारसंघांमधून निवडणूक लढणे पसंद केले आहे. त्यांनी राज्यसभेचा पर्याय क्वचितच निवडला. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात राज्यसभेचा मार्ग स्वीकारला होता. मात्र, १९७८ साली त्यांनी कर्नाटकमधील चिक्कमगलुरुमधील लोकसभेची पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

या पोटनिवडणुकीत त्यांनी जनता पक्षाचे प्रतिस्पर्धी वीरेंद्र पाटील यांचा पराभव केला. पुढे १९८० साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी रायबरेली आणि आंध्रप्रदेशातील मेडक या दोन्ही जागांवर निवडणूक लढवली. या दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाला. मात्र, त्यांनी मेडची जागा कायम ठेवत, रायबरेलीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. सोनिया गांधी यांनीही आपल्या राजकीय कारकीर्दीतीची सुरुवात करताना, कर्नाटकच्या बेल्लारी मतदारसंघाचा विचार केला होता.

हेही वाचा – नितीश कुमार भाजपाबरोबर नव्या कपड्यांत; ‘धर्मनिरपेक्षते’च्या भूमिकेत बदल होणार का?

दरम्यान, २ आणि ३ एप्रिल रोजी राज्यसभेतील ५६ सदस्य निवृत्त होणार आहे. त्यापैकी २८ खासदार हे भाजपाचे तर १० खासदार हे काँग्रेसचे आहेत. या जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. सद्यस्थितीत काँग्रेसच्या आमदारांची संख्या बघता, काँग्रेस कर्नाटकमध्ये चार पैकी तीन जागा, तेलंगणात तीन पैकी दोन जागा आणि हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी एक जागा जिंकण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे महाराष्ट्रातही काँग्रेसचा एक उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. मात्र, नुकताच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पक्षातील काही आमदारही नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनिश्चिततेचे वातारण आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi will contest rajyasabha priyanka gandhi may make poll debut from raebareli loksabha elections 2024 spb
Show comments