देशाच्या राजकारणात सध्या चर्चा सुरु आहे, काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार याची. एका बाजूला राष्ट्रीय अध्यपदाच्या निवडीवरुन काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरु आहे. तर, दुसरीकडे राजस्थानमध्ये सुद्धा मुख्यमंत्री बदलाचे वारे सुरु आहे. त्यातच आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाल्या होत्या.

देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. काँग्रेसनेही त्याच पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो यात्रा’ सुरु केली आहे. ‘भारत जोडो यात्रा’ केरळमधून कर्नाटकमध्ये पोहचली आहे. त्यात सोनिया गांधींनी देखील गुरुवारी यात्रेत सहभाग नोंदवला.

कर्नाटकमधील बेल्लाळेपासून सुरु झालेल्या यात्रेत सोनिया गांधी सामील झाल्या. सोनिया गांधींनी एक किलोमीटर पायी प्रवास केला. मग, राहुल गांधींनी त्यांना परत कारने प्रवास करण्यात सांगितलं. काही वेळ गेल्यावर जक्कनहल्ली ते चौदेनहल्ली या एक किलोमीटर प्रवासात सोनिया गांधींनी पुन्हा सहभाग नोंदवला. त्यानंतर सोनिया गांधी दिल्लीला रवाना झाल्या.

मात्र, सोनिया गांधी तब्येतीच्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हत्या. बऱ्याच दिवसानंतर त्यांनी ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणखी भर पडली. तर, कर्नाटकात प्रवेश केल्यापासून यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतं आहे.

यात्रेवेळी राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्या सुंदर नात्याची साक्ष देणारा फोटो व्हायरल झाला. या फोटोत राहुल यांनी सोनिया गांधी यांचे अक्षरशः पाय धरले आहेत. सोनिया गांधी यांच्या शूजची लेस बांधण्यासाठी राहुल गांधी अगदी भररस्त्यात गुडघ्यावर बसून लेस बांधत आहेत. अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त करत राहुल गांधींन श्रावणबाळ म्हटलं आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादी वगळून शिवसेना आणि काँग्रेसशी युतीसाठी प्रकाश आंबेडकर तयार

हेही वाचा – अमित शाहांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यातून भाजपाची आगामी विधासभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती!

दरम्यान, गुरुवारी ‘भारत जोडो यात्रे’चा २९ वा दिवस होता. मंड्या जिल्ह्यातील पांडवपुरा आणि नेलमंगला मतदारसंघात यात्रा पोहचली. यावेळी राहुल गांधींनी कर्नाटक सरकारवर टीकास्त्र सोडलं. “दिल्लीत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केल्यानंतर केंद्र सरकारने वादग्रस्त तीन शेतकरी कायदे माघारी घेतले. मात्र, राज्य सरकारने अद्याप ते रद्द केले नाहीत,” अशी टीका राहुल गांधींनी राज्यातील भाजपा सरकारवर केली.

Story img Loader