नवी दिल्ली : राज्यसभेतील १२ जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी भाजपने नऊ उमेदवारांची घोषणा केली असून राज्यातून दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे विधानसभा निवडणुकीतील ‘मिशन कोकणा’ला वेग मिळाला आहे.
केंद्रीयमंत्री पीयुष गोयल व भाजपचे नेते उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यामुळे राज्यातून राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यापैकी उदयनराजेंची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. पीयुष गोयल यांच्या जागी धैर्यशील पाटील यांना संधी देऊन भाजपचे त्यांचे पुनर्वसन केले असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा : “मोदीशहांच्या हाती महाराष्ट्र देऊ नका!”, मल्लिकार्जुन खरगे यांचे आवाहन
‘शेकाप’चे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पाटील यांना रायगडमधून लोकसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, महायुतीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्याने ही जागा भाजपला मित्र पक्षासाठी सोडून द्यावी लागली. पाटील यांची लोकसभेची संधी हुकल्यामुळे त्यांना यावेळी भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
भाजपने पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्याची स्मृती इराणी यांची इच्छा मात्र अपुरी राहिल्याचे मानले जात आहे. राजस्थानातील रिक्त जागेवरही इराणी यांच्या उमेदवारीची चर्चा होत होती. मात्र, या जागेवर केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल केरळमधील अल्लपुळा या मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाल्यामुळे राजस्थानमधील त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे लोकसभेचे सदस्य झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांना संधी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांना संधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने राज्यसभेसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. पाटील हे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.