Loksabha Election 2024 समाजवादी पक्ष (सपा) उत्तर प्रदेशमधील ६२ जागांवर निवडणूक लढविणार आहे. सपाने या ६२ मतदारसंघांपैकी १० मतदारसंघांतील उमेदवार आतापर्यंत बदलले आहेत. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्वत: त्यांचा पुतण्या तेज प्रताप यादव यांना पक्षाच्या बालेकिल्ला असलेल्या कन्नौजमधून उमेदवारी दिली होती. मात्र, तीन दिवसांनंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. शुक्रवारी (२६ एप्रिल) उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान पक्षाचे शाहजहांपूर येथील उमेदवार राजेश कश्यप यांना कळले की, सपाने त्यांचे नाव रद्द केले आहे. त्यांनी २२ एप्रिल रोजी कागदपत्रे दाखल केली होती.
उमेदवारांच्या सतत बदलण्याबद्दल विचारले असता, सपाच्या एका नेत्याने सांगितले, “पक्षाने जातीय समीकरणांवर आधारित निवडणूक लढविण्यासाठी अनेक नेत्यांची निवड केली. परंतु, या उमेदवारांमधील बहुतेकांना जिल्हा युनिटमधील सपा नेतृत्वाने पाठिंबा दिलेला नाही. उदाहरणार्थ, गेल्या काही वर्षांत जवळ जवळ १५ जण बसपमधून सपामध्ये आले आहेत. सपाने या बाहेरच्या लोकांनाही उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून याला विरोध होत आहे आणि ते अध्यक्षांना उमेदवारी बदलण्यास भाग पाडत आहेत.” कन्नौजमध्ये स्थानिक नेतृत्वाने तेज प्रताप यांच्या उमेदवारीला विरोध केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : हाथरस बलात्कार प्रकरणामुळे भाजपा अडचणीत? काँग्रेस-सपा भाजपाचा बालेकिल्ला भेदणार का?
सातत्याने अशा उमेदवार बदली करण्यामुळे विरोधक सपावर टीकास्त्रे सोडताना दिसत आहेत. जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक दलाने (आरएलडी) सपा गोंधळलेला पक्ष असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा-आरएलडी युती आहे. पक्षाचा बचाव करताना, सपाचे राष्ट्रीय प्रवक्ते फराज उद्दीन किडवाई म्हणाले, “भाजपाने मीनाक्षी लेखी, माजी जनरल व्ही. के. सिंह व परवेश वर्मा यांच्यासह अनेक विद्यमान खासदारांना तिकीट नाकारले. प्रत्येक राजकीय पक्षाची रणनीती असते. आपल्या खासदारांनी मागील पाच वर्षांत कोणतेही काम केलेले नाही हे जाणून भाजपाने अनेक खासदारांना तिकीट नाकारले.”
सपाने उमेदवार बदललेल्या जागा…
मेरठ : सपाने १५ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाचे वकील भानू प्रताप सिंह यांना आणि त्यानंतर सपाने सरधनाचे आमदार अतुल प्रधान यांना उमेदवारी दिली होती. परंतु, अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपण्याच्या एक दिवस आधी सपाने मेरठच्या माजी महापौर सुनीता वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
बागपत : पक्षाने सुरुवातीला मनोज चौधरी यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी २०१२ व २०१७ मध्येही चपरौली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु, नंतर सपाने साहिबाबादमधील बहुजन समाज पक्षाचे (बसप) माजी आमदार अमरपाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली.
गौतम बुद्ध नगर : पक्षाने १६ मार्च रोजी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. महेंद्र नागर यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर त्यांनी राहुल अवाना यांना उमेदवार म्हणून घोषित केले. १२ दिवसांनंतर त्यांनी पुन्हा नागर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
बदायूं : सपाने या प्रतिष्ठेच्या जागेवरील उमेदवार तीनदा बदलला. प्रथम त्यांनी माजी खासदार व अखिलेश यांचे चुलतभाऊ धर्मेंद्र यादव यांना उमेदवारी दिली. काही दिवसांनी सपा प्रमुखांचे काका व ज्येष्ठ नेते शिवपाल यादव यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर १४ एप्रिल रोजी पक्षाने जाहीर केले की, शिवपाल यांचे पुत्र आदित्य या जागेवरून निवडणूक लढवतील.
बिजनौर : पक्षाने १५ मार्च रोजी माजी नगीना खासदार यशवीर सिंह यांना उमेदवारी जाहीर केली. एका आठवड्यानंतर त्यांनी नुरपूरचे आमदार राम अवतार सैनी यांचे पुत्र दीपक सैनी यांना उमेदवारी दिली.
सुलतानपूर : सपाने या जागेववर राज्य सचिव भीम निषाद यांना उमेदवारी दिली होती; परंतु १४ एप्रिल रोजी बसपचे माजी मंत्री राम भुवाल निषाद यांना उमेदवारी देण्यात आली. आता पक्ष पुन्हा या जागेवरून आपला उमेदवार बदलू शकतो, अशी अटकळ आहे.
मिश्रिख : या जागेवर सपाने माजी खासदार रामाशंकर भार्गव यांच्या नावाची घोषणा केली होती. नंतर त्यात बदल करून, आमदार राम पाल राजवंशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर पक्षाने राजवंशी यांचे पुत्र मनोज आणि नंतर मनोज यांची पत्नी संगीता यांना उमेदवारी दिली गेली. सरतेशेवटी या जागेसाठी पुन्हा रमाशंकर भार्गव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मुरादाबाद : पक्षाने प्रथम विद्यमान खासदार एस. टी. हसन यांना उमेदवारी दिली होती. परंतु, २८ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ज्येष्ठ नेते आझम खान यांचे निकटवर्तीय असलेले बिजनौरचे माजी आमदार रुची वीरा यांना उमेदवारी देण्यात आली.
कन्नौज : पक्षाने २२ एप्रिल रोजी अखिलेश यांचे पुतणे तेज प्रताप यादव हे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले होते. परंतु, दोन दिवसांनंतर जाहीर करण्यात आले की, सपा प्रमुख स्वतः यादव कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या या जागेवरून निवडणूक लढवतील. १९९९ पासून सपाने ही जागा जिंकली आहे. २०१९ मध्ये मात्र ही जागा भाजपाने जिंकली.
हेही वाचा : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या ‘निर्भयादीदी’ची जादू; कोण आहेत श्रीरूपा मित्रा-चौधरी?
शाहजहांपूर : पक्षाने सुरुवातीला येथे ४३ वर्षीय राजेश कश्यप यांना उमेदवारी दिली होती. पण, शुक्रवारी त्यांना कळले की, त्यांची जागा २६ वर्षीय ज्योत्स्ना गोंड यांना देण्यात आली आहे. “अखिलेश यादव यांचे एक पत्र रिटर्निंग ऑफिसरला सादर करण्यात आले होते की, माझे नाव रद्द करण्यात आले आहे आणि आता ज्योत्स्ना गोंड त्यांच्या उमेदवार आहेत. हे पत्र पाहिल्यानंतर माझी पक्ष आणि अध्यक्षांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले.” अखिलेश यांनी सांगितल्यानंतर मी तीन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करीत असल्याचा दावा कश्यप यांनी केला.