Loksabha Election 2024 आगामी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अखिलेश आणि पत्नी डिंपल दोघेही यादवांसाठी प्रतिष्ठित असणार्या कन्नौज आणि मैनपुरी या जागांवरून निवडणूक लढवीत आहेत. या दोन्ही जागा पूर्वी सपाप्रमुख मुलायम सिंह यादव यांनी जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये डिंपल यांनी कन्नौजमधून निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. मुलायम सिंह यादव यांच्या मृत्यूनंतर मैनपुरी जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती, ज्यात त्या विजयी झाल्या होत्या.
मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत. ७ मे रोजी मैनपुरी आणि १३ मे रोजी कन्नौज येथे मतदान पार पडणार आहे. यादव समुदाय सपाबरोबर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, मुलायम सिंह यांच्याबरोबर असणारा बिगरयादव ओबीसी वर्ग सपाकडे पाठ फिरवताना दिसत आहे. मुलायम सिंह यांनी मैनपुरी जागा तब्बल पाच वेळा म्हणजे २०१९, २०१४, २००९, २००४ व १९९६ मध्ये जिंकली होती. याच जागेवर डिसेंबर २०२२ च्या पोटनिवडणुकीत डिंपल यांचा २.८८ लाख मतांनी विजय झाला होता; परंतु या विजयाला सहानुभूतीचा विजय म्हणून पाहिले गेले.
हेही वाचा : काँग्रेसकडून बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेत्यांनाही उमेदवारी, कारण काय?
डिंपल यादव
डिंपल या चुकून राजकारणात आल्याचे आजही बोलले जाते. यावेळी त्या स्वबळावर निवडणूक लढवत असल्याचे बोलले जात आहे. अखिलेश यादव कन्नौजमध्ये स्वतःच्या प्रचारात व्यस्त आहेत आणि पक्षाची राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकीची तयारी पाहत आहेत. मुलायम यांच्या नावाची घोषणा सर्वत्र होत नसली तरी डिंपल यांना स्पष्टपणे माहीत आहे की, मुलायम सिंह यांच्या नावाचा निवडणुकीत त्यांना फायदा होईल. विशेष म्हणजे मतदारांना केलेल्या लेखी आवाहनात डिंपल यादव यांनी मुलायम सिंह यांच्या नावाचा वारंवार संदर्भ दिला आणि त्यांनी केलेल्या कामांची लोकांना आठवण करून देत, त्यांची विचारधारा पुढे नेण्याची शपथ घेतली आहे.
“सपाचे नेते अहंकारी”
जटपुरा गावातील प्रभू राम लोधी म्हणतात, “मुलायम सिंह इथल्या प्रत्येकाला आपल्या कुटुंबाप्रमाणे वागवायचे. मात्र, पक्षाचे सध्याचे नेते अहंकारी आहेत. इतर मतदारसंघांतील माझे नातेवाईक भाजपाला मत देतात आणि मीही असेच करेन.” ओबीसी शाक्यबहुल इमालिया गावातील अमरसिंह शाक्यदेखील आता मुलायम सिंह नसल्यामुळे त्यांच्या पर्यायांचा पुनर्विचार करीत आहेत. डिंपल आपला बहुतेक वेळ जटवारा आणि इमालियासह बिगरयादवबहुल गावांमध्ये घालवीत आहेत. ही दोन गावे भोनगाव विधानसभेच्या जागेत मोडतात.
ओबीसी मतांच्या विभाजनावर निकालाचे गणित
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मैनपुरी लोकसभेच्या पाच जागांपैकी सपाने तीन आणि भाजपाने दोन जागा जिंकल्या. अखिलेश हे करहलमधून आमदार म्हणून निवडून आले; तर मुलायम यांचे धाकटे बंधू शिवपाल सिंह यादव जसवंतनगरमधून विजयी झाले. यादवांची संख्या सुमारे ४.५ लाख असून, शाक्य समुदायाची संख्या ३.२५ लाख आहे. त्यानंतर लोध राजपूतांची संख्या २.१५ लाख; तर दलितांची संख्या सुमारे १.२ लाख आणि मुस्लिमांची संख्या सुमारे ६० हजार आहे. उर्वरित सुमारे ३.३५ लाख मतदार हे उच्चवर्णीय ठाकूर आणि ब्राह्मण समुदायातील आहेत. त्यामुळे ओबीसी मतांचे विभाजन कसे होते यावर निकालाचे गणित अवलंबून आहे.
सपाचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री आलोक शाक्य यांनी डिंपल यांच्या सभांना शाक्य, पाल व लोध समाजातील महिला उपस्थित राहतील याची खातरजमा करण्याची जबाबदारी घेतली आहे. लोध राजपूत नेते कमल वर्मा यांनी त्यांच्या पत्नीला मैनपुरी नगरपालिका अध्यक्षपद नाकारून भाजपाचा अपमान केल्याची चर्चा आहे. मैनपुरीचे विद्यमान आमदार व भाजपाचे मैनपुरी लोकसभा उमेदवार असलेले ठाकूर नेते जयवीर सिंह यांना त्यांनी दोष दिला आहे. डिंपलच्या प्रचारात गुलशन देव शाक्य यांचा समावेश आहे, ज्यांना बसपने मैनपुरीमधून उमेदवार म्हणून घोषित केले आणि नंतर वगळले.
बसपमुळे सपाच्या यादव मतांमध्ये कपात?
गेल्या आठवड्यात मैनपुरी येथील एका सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उल्लेख केला की, मुलायम सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी सैफईला भेट दिली होती. त्यांनी याला सपाच्या भेदभावाचे उदाहरण म्हटले. डिंपल यांच्यासाठी बसपचे उमेदवार शिवप्रसाद यादव अडचण निर्माण करू शकतात. ते स्पर्धेत असल्यामुळे सपाच्या यादव मतांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. डिंपल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, त्यांना याची काळजी नाही आणि त्यांना समाजातून मते मिळतील.
मैनपुरी लोकसभेची जागा भाजपाने कधीही जिंकलेली नाही. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भूपेंद्र यादव म्हणतात, “सपा करहेल आणि जसवंतनगर विभागात निर्णायक आघाडी घेते, जिथे ९० टक्के मतदार यादव आहेत.” तर भाजपाच्या दुसर्या नेत्याच्या मते, “भाजपाला पाठिंबा देणारे ९० टक्के शाक्य आहेत आणि आता बसप सपाची ३० हजारांहून अधिक मते कमी करील.”
शाळा आणि दुग्ध व्यवसाय चालवणारे आणि निवडणुकीत नशीब आजमावणारे बसपचे शिवप्रसाद यादव म्हणतात की, त्यांना नाकारणे चुकीचे ठरेल. “मी यादवांमधील घोसी उपवर्गातील आहे. (मुलायमसिंग) यादव कुटुंबाने येथील घोसींचा नाश केला आहे,” असे ते सांगतात. २ मे रोजी बसप अध्यक्ष मायावती मैनपुरी येथे एका सभेला संबोधित करणार आहेत.
अखिलेश यादव
इत्रा आणि परफ्यूम उद्योगासाठी प्रसिद्ध कन्नौजमध्ये सध्या नवीन सूर ऐकायला मिळत आहे. पूर्वी पुतण्याला दिलेल्या जागेवरून आता स्वतः अखिलेश यादव निवडणूक लढविणार आहेत. स्थानिक सपा कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून पुतणे व मैनपुरीचे माजी खासदार तेज प्रताप यादव यांच्या जागी निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे कन्नौज ही उत्तर प्रदेशमधील लोकसभा निवडणुकीतील सर्वांत लोकप्रिय लढतींपैकी एक झाली आहे.
उमेदवार बदलणे पूर्वनियोजित
सपाचे कन्नौज येथील जिल्हाध्यक्ष कलीम खान यांनी, ”हे सर्व पूर्वनियोजित होते. उशिराने घेतलेल्या निर्णयामुळे अखिलेश यांच्या नामांकनानंतर भाजपाला उमेदवार व विद्यमान खासदार सुब्रत पाठक यांना बदलण्याची संधी मिळाली नाही. पाठक यांनी २०१९ मध्ये डिंपल यांना या जागेवरून पराभूत केल्यामुळे अखिलेशना त्यांचा पराभव करायचा आहे. अखिलेश यांच्याविरुद्ध पराभव होण्याच्या भीतीने भाजपा पाठक यांना डावलणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण, तेज प्रताप यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपाने उमेदवार बदलला नाही. आता अखिलेशजींनी पाठक यांचा पराभव निश्चित केला आहे,” असे सांगितले.
२०१९ मध्ये डिंपल यांच्या पराभवापूर्वी कन्नौजमध्ये १९९९ ते २०१४ पर्यंत यादव कुटुंबातील सदस्याचाच विजय झाला. कन्नौजमध्ये मुस्लिमांची संख्या तीन लाख आहे. दलितांची संख्या सुमारे २.८ लाख आणि यादवांची संख्या २.५ लाख आहे. गेल्या वेळी यादव आणि दलित मतदारांनी पाठिंबा दिल्याने भाजपाने विजय मिळवला होता.
कन्नौज येथील व्यापारी शिवम तिवारी म्हणतात की, पाठक हे मुख्यतः उच्च जाती आणि दलितांच्या पाठिंब्यामुळे जिंकले. परफ्यूम उत्पादक मोहम्मद नायब म्हणतात की, ते सपा समर्थक आहेत. “अखिलेश हे सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे ही स्पर्धा रोचक झाली आहे. आता सपाचे कार्यकर्ते मैदानात सक्रिय झाले आहेत; पूर्वी ते नव्हते.” परफ्यूम व्यवसायात नुकसान होत असल्याचेही ते सांगतात. केंद्र सरकार १८ टक्के कर (जीएसटी) घेत आहे, पण उद्योगासाठी काहीच करत नाही.” पुण्यात परफ्यूम शोरूम आहेत आणि कन्नौजमध्ये उत्पादन युनिट असलेले अभिजीत सी. केळकर थेट शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या कुटीर उद्योगावरील करांबद्दल तक्रार करतात.
“मोदी एक ब्रॅंड”
सपाचे खान म्हणतात की, मुस्लिमांव्यतिरिक्त पक्षाला बिगरयादव ओबीसी आणि उच्च जातींचीही मते मिळण्याचा विश्वास आहे. बडा बाजार भागातील परफ्यूम उत्पादक प्रफुल्ल केळकर म्हणतात की, पाठक यांच्यासाठी २०१९ ची पुनरावृत्ती करणे कठीण असले तरी ते जिंकतील, कारण नरेंद्र मोदीजी एक ब्रँड आहेत.
हेही वाचा : रिक्षाचालक ते टेलर, ‘हे’ आहेत वायएसआर काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक
यावेळी सपा आणि बसप स्वतंत्रपणे लढल्यामुळे भाजपाला पाठक यांच्या विजयाचा अधिक विश्वास आहे. २०१९ मध्ये जेव्हा दोन्ही पक्षांची युती होती, तरीही त्यांनी ही जागा जिंकली होती. “ही निवडणूक सोपी होईल. कारण दलित आणि मुस्लीम मते बसप आणि सपामध्ये विभागली जातील,” असे भाजपा नेते शरद मिश्रा म्हणतात. बसपने या जागेवरून इमरान बिन जफर यांना उमेदवारी दिली आहे. ते चामड्याचे व्यापारी आहेत. त्यांनी २०१४ मध्ये कन्नौजमधून आम आदमी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्यांना फक्त ४,८२६ मते मिळाली होती.