आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवासाठी विरोधक एकत्र आले आहेत. या आघाडीच्या आतापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र, जागावाटपाच्या चर्चेवर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. जागावाटप लवकरात लवकर करावे, अशी मागणी आघाडीच्या पक्षांतील काही नेत्यांकडून होत आहे. मात्र, ती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. असे असतानाच आता इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पार्टी (सपा) हे दोन पक्ष मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. तसेच काँग्रेस पक्ष मित्रपक्षांना धोका देत आहे, असेही यादव म्हणाले आहेत.

काँग्रेसने फसवणूक केल्याचा अखिलेश यादव यांचा आरोप

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे सध्या काँग्रेस आणि समाजवादी पार्टीममध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा फलदायी ठरण्याची शक्यता कमी आहे. हे दोन्ही पक्ष आता एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. अखिलेश यादव यांनी तर काँग्रेस पक्षाने आमची फसवणूक केली, असा गंभीर आरोप केला आहे.

latur district, Congress Deshmukh family, Nilangekar family
काँग्रेसमध्ये देशमुख यांना एक न्याय व निलंगेकरांना दुसरा याबद्दल असंतोष
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Senior Maharashtra minister Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar: लोकसभेनंतर भाजपाने रणनीतीत ‘हा’ महत्त्वाचा बदल केला, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “RSS ने लोकसभेवेळी…”
worli assembly constituency Milind deora might be contest against aaditya thackeray
Worli Assembly Constituency: वरळीत शिंदे गटाकडून खासदार मिलिंद देवरा निवडणुकीत उतरणार? संजय राऊत म्हणाले, “थेट जय शाहांनाच…”
three major parties in maha vikas aghadi to leave 18 seats for six small parties
१८ जागांमध्ये छोट्या पक्षांत रस्सीखेच; आघाडीने दिलेली लेखी हमी उघड करण्याचा इशारा
mla Manohar chandrikapure
गोंदिया: राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली, ‘या’ विद्यमान आमदारांचा थेट तिसऱ्या आघाडीत प्रवेश
Samajwadi Party Maharashtra Assembly Election 2024
सपाची हुकमी चाल! मविआच्या साथीने MIM व महायुतीला शह? पाच मतदारसंघात लोकसभेची पुनरावृत्ती होणार?
vba leader prakash ambedkar rally for maharashtra assembly election
“…तर विधानसभा निवडणुकीनंतर नोकरी, शिक्षणातील आरक्षण संपेल,” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

निवडणूक न लढवण्याचा काँग्रेसचा सपाला सल्ला

समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. सपाने काही जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादीदेखील प्रसिद्ध केली आहे. मात्र “समाजवादी पार्टीला मध्य प्रदेशमध्ये जनाधार नसून, त्यांनी आपले उमेदवार मागे घ्यावेत,” अशी मागणी उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केली आहे. मात्र, राय यांच्या या भूमिकेनंतर अखिलेश यादव चांगलेच आक्रमक झाले आहेत. राय यांच्या या विधानावर १९ ऑक्टोबर रोजी अखिलेश यादव यांनी सितापूर येथे भाष्य केले. “तुम्ही कोणत्या नेत्याबद्दल मला विचारत आहात. अजय राय यांना या प्रकरणावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. पाटणा आणि मुंबई येथील इंडिया आघाडीच्या बैठकीत अजय राय नव्हते. या बैठकांत नेमके काय घडले? याबाबत अजय राय यांना काहीही कल्पना नाही,” असे अखिलेश यादव म्हणाले. तसेच काँग्रेसने अशा कोणत्याही नेत्याला विधाने करण्यास परवानगी देऊ नये, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला दिला.

“… तर मी माझ्या नेत्यांना पाठवलेच नसते”

अखिलेश यादव यांनी मध्य प्रदेशचे काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांच्यावरही टीका केली आहे. आमचे समाजवादी पार्टीचे नेते या दोन्ही नेत्यांशी जागावाटपावर चर्चा करण्यासाठी गेले होते. मात्र, आमच्या नेत्यांना दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांनी सकाळी १ वाजेपर्यंत बसवून ठेवले, असा आरोप अखिलेश दाव यांनी केला. “काँग्रेस हा पक्ष इतर पक्षांची फसवणूक करीत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे. इंडिया आघाडी ही राज्य पातळीवर नाही, हे मला अगोदर माहिती असते, तर  बोलणी करण्यासाठी मी माझ्या नेत्यांना दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्याकडे पाठवलेच नसते,” असे अखिलेश यादव म्हणाले.

सपाने केली २२ उमेदवारांची यादी जाहीर

इंडिया आघाडी ही लोकसभेच्या निवडणुकीसाठीच असेल, तर हेच सूत्र आम्ही उत्तर प्रदेशमध्येही राबवू, असा इशाराही अखिलेश यादव यांनी दिला. समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशमध्ये सात जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. असे असताना त्यापैकी चार जागांवर काँग्रेसनेही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर समाजवादी पार्टीने आपले आणखी नऊ उमेदवार जाहीर केले. तसेच काही दिवसांनी आपल्या २२ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. याच कारणामुळे मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस आणि समजावादी पार्टी या दोन्ही पक्षांत संघर्ष सुरू झाला आहे.  

“समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला पाठिंबा द्यावा”

अखिलेश यादव यांच्या या भूमिकेनंतर अजय राय यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीने काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे. कोणताही जनाधार नसताना उमेदवार उभे करण्याऐवजी समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे,” असे अजय राय म्हणाले. तसेच २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना, ‘उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीशी आघाडी करायची की नाही, याबाबतचा निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र, सध्या तरी आम्ही लोकसभेच्या सर्व ८० जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे,’ अशी माहिती राय यांनी दिली.