रामचरितमानसबाबत सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा अजून शमलेला नाही. अशात आणखी एका समाजवादी पक्षाच्या नेत्याने रामचरितमानसबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सपा नेते आणि माजी आमदार ब्रजेश प्रजापती यांनी स्वामी प्रसाद यांना पाठिंबा देत म्हटलं आहे रामचरितमानस मध्ये काही वादग्रस्त ओळी आहेत आणि त्या दूर केल्या गेल्या पाहिजेत. तसं करायचं नसेल तर रामचरितमानसवर सरकारने बंदी घातली पाहिजे. रामचरितमानसवरून वाद सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा एका नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
ब्रजेश प्रजापती काय म्हणाले आहेत?
रामचरितमानस मध्ये काही ओळी अशा आहेत ज्यामुळे आदिवासी समाज, दलित बांधव आणि मागासवर्गीय बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहेत. सोशल मीडियावरही ब्रजेश प्रजापती यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. रामचरितमानसमधल्या त्या ओळी हायलाइटही केल्या होत्या. त्यांनी या पोस्टमध्ये असं लिहिलं होतं की या ओळींना आमचाही विरोध आहे. तसंच सरकारने या ग्रंथावर बंदी घातली पाहिजे.
ब्रजेश प्रजापती भाजपाचे आमदार होते
ब्रजेश प्राजपती यांनी बांदा या ठिकाणाच्या तिन्दवारी मधून भाजापच्या तिकिटावर निवडणूक लढली होती आणि आमदार झाले होते. मात्र २०२२ च्या निवडणुकांपूर्वी जेव्हा स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपाची साथ सोडली तेव्हा त्यांच्या पाठोपाठ ब्रजेश प्रजापती यांनी भाजपाला रामराम केला. स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानस बाबत जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्यावर ते ठाम आहेत. त्यांचं म्हणणं आहे की प्रभू रामचंद्र किंवा रामचरितमानस यापैकी कुणाचाही अपमान केलेला नाही. मला फक्त त्या ग्रंथातल्या काही ओळींवर आक्षेप आहे आणि त्या ओळी हटवण्याची मागणी मी केली आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी काय म्हटलं होतं?
स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे की धर्म कुठलाही असो आम्ही त्या धर्माचा सन्मानच करतो. मात्र धर्माच्या नावावर विशिष्ट जात आणि विशिष्ट धर्माच्या लोकांना अपमानित करण्यात आलं आहे. आमचा आक्षेप हा याच गोष्टीवर आहे. रामचरितमानसमध्ये एक चौपाई लिहिली आहे, त्यामध्ये तुलसीदास म्हणतात की शूद्र हे अधम जातीचे आहेत. यापुढे तुलसीदास म्हणतात की ब्राह्मण दुराचारी, निरक्षर असला तरीही तो ब्राह्मण आहे आणि त्यामुळे तो पूजनीय आहे. मात्र शूद्र हा किती ज्ञानी, विद्वान असला तरीही त्याचा सन्मान करू नका. जर असं त्यांचं म्हणणं असेल तर मी अशा धर्माला नमस्कार करतो आणि ही आशा बाळगतो की या धर्माचा सत्यानाश होईल कारण हा धर्म आमचा सत्यानाश करू पाहतो आहे. असंही मौर्य यांनी म्हटलं आहे. आज तकला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरून वाद सुरू असतानाच आणखी एका सपा नेत्याने रामचरितमानस विरोधी वक्तव्य केलं आहे. या ग्रंथावर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे.