काही दिवसांपासून समाजवादी पार्टीच्या आमदार सैयदा खातून चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांनी सिद्धार्थनगर जिल्ह्यातील बालवा गावातील एका मंदिराला भेट दिल्यानंतर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी गंगाजलाने या मंदिराचे शुद्धीकरण केले आहे. शनिवारी (२५ नोव्हेंबर) ही घटना घडली. सैयदा या मांसाहार करीत असल्यामुळे या मंदिराचे पावित्र्य नष्ट झाले आहे. याच कारणामुळे आम्ही या मंदिराचे शुद्धीकरण केले, असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला. मात्र, भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या या कृत्यानंतरही सैयदा यांनी मला जेथे जेथे बोलावले जाईल, तेथे तेथे मी भेट देणार आहे. मी फक्त एका समाजाची नव्हे, तर संपूर्ण मतदारसंघाची लोकप्रतिनिधी आहे, असे सैयदा म्हणाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधीही सैयदा होत्या चर्चेत

डोमरियागंज मतदारसंघातून विजय मिळाल्यापासून सैयदा दुसऱ्यांना देशभरात दुसऱ्यांदा चर्चेत आल्या आहेत. याआधी गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यात सैयदा यांच्यासह समाजवादी पार्टीच्या एकूण २०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सैयदा, तसेच समाजवादी पार्टीच्या काही नेत्यांनी पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्या आहेत, असा आरोप तेव्हा करण्यात आला होता. याबाबतची एक व्हिडीओ क्लिपदेखील तेव्हा समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आली होती. त्यानंतर दोन गटांत शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न करण्यासह वेगवेगळ्या आरोपांखाली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

“मी निर्दोष असल्याचे सिद्ध झाले होते”

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सैयदा यांनी प्रतिक्रिया दिली. “याआधी मार्च २०२२ मध्ये माझ्याविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली होती. त्यातून मी निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. मला क्लीन चिट देण्यात आली होती,” असे सैयदा म्हणाल्या.

सैयदा यांचे वडील आणि आई होत्या आमदार

दरम्यान, सैयदा यांचे वडील तौफिक अहमद हेदेखील आमदार राहिलेले आहेत. त्यांनी डोमरियागंज या मतदारसंघातून समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या दोन्ही पक्षांच्या तिकिटावर दोन वेळा विजय मिळवला होता. २०१० साली त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर अहमद यांच्या पत्नी खातून तौफिक यांनी बीएसपीच्या तिकिटावर डोमरियागंज मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकली होती. याच जागेवरून सैयदा यांनी बीएसपीच्या तिकिटावर २०१२ आणि २०१७ सालची विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या दोन्ही निवडणुकांत त्यांचा पराभव झाला होता. पुढे त्यांनी समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवीत भाजपाचे उमेदवार राघवेंद्र प्रताप सिंह यांचा ७७१ मतांच्या फरकाने पराभव केला होता.

“गरज नसताना वाद निर्माण केला जातोय”

मंदिरभेटीनंतर भाजपाच्या नेत्यांनी केलेल्या शुद्धीकरणावरही सैयदा यांनी प्रतिक्रिया दिली. काही भरकटलेल्या लोकांकडून वाद निर्माण केला जात आहे. मात्र, मी मंदिरांना भेट देण्याचे थांबवणार नाही, असे त्या म्हणाल्या. “मी आतापर्यंत अनेक मंदिरांसाठी काम केलेले असून, त्यांना भेटी दिलेल्या आहेत. काही लोक गरज नसताना वाद निर्माण करीत आहेत. लक्ष वेधून घेण्यासाठी हे सर्व काही केले जात आहे,” असे त्या म्हणाल्या.

बालवा मंदिरातील घटनेवर बोलताना त्या म्हणाल्या की, मला त्या गावातील स्थानिकांनी निमंत्रित केले होते. मी तेथे गेल्यानंतर त्या लोकांनी माझे स्वागत केले. अन्य जिल्ह्यातील कथावाचक पुजाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनीदेखील माझे स्वागत केले. यज्ञ झाल्यानंतर मी मंदिराला भेट दिली. त्या मंदिराला भेट देण्यासंदर्भात कोणतेही नियम नव्हते.

“आमदार खातून यांनी मंदिराचा अवमान केला”

मात्र, सैयदा यांच्या मंदिरभेटीनंतर भाजपाचे स्थानिक नेते धर्मराज वर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे काही नेते त्या मंदिरात गेले. तेथे या लोकांनी गंगाजल शिंपडून मंदिराचे कथित शुद्धीकरण केले. आमदार सैयदा या अन्य धर्माच्या आहेत. त्यामुळे या मंदिराचे पावित्र्य नष्ट झाले होते, असा दावा या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला. “आमदार खातून यांनी मंदिराचा अवमान केलेला आहे. त्या मांसाहार करतात. त्यांनी मंदिराला भेट देणे टाळायला पाहिजे होते,” असे वर्मा म्हणाले.

“मला १० दिवसांपूर्वीच आमंत्रित करण्यात आले होते”

भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा हा दावा सैयदा यांनी खोडून काढला. “या भागातील अनेक भक्त तसेच पुजारी माझ्या संपर्कात आहेत. या मंदिरात आयोजित केलेल्या महापूजेच्या कार्यक्रमाला मला १० दिवसांपूर्वीच आमंत्रित करण्यात आले होते. मी प्रत्येक धर्माचा आदर करते. मी सर्व लोकांची लोकप्रतिनिधी आहे. मला ज्या ज्या ठिकाणी बोलावले जाईल, मी त्या प्रत्येक ठिकाणाला भेट देईन,” अशी भूमिका सैयदा यांनी घेतली.

मंदिरातील पुजाऱ्याने दिली प्रतिक्रिया

सैयदा यांनी भेट दिलेल्या मंदिरातील पुजारी कृष्णा दत्त शुक्ला यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “महायज्ञासाठी आमदार सैयदा यांना स्थानिक लोकांनी आमंत्रित केले होते. या यज्ञाजवळ त्या काही काळ थांबल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सामाजिक सौहार्दावरही भाष्य केले. सैयदा यांच्या या भेटीच्या दुसऱ्या दिवशी वर्मा यांच्यासह त्यांचे काही लोक आले. सैयदा यांना आमंत्रित का करण्यात आले होते, असा प्रश्न त्यांनी मला केला. त्यांच्या येण्याने हे मंदिर अपवित्र झाले आहे, असे म्हणत त्यांनी मंदिर परिसरात गंगाजल शिंपडले,” असे शुक्ला यांनी सांगितले.

“मंदिर परिसरात गंगाजल शिंपडणे फार चुकीचे”

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी या मंदिर परिसरात सुरक्षा वाढवलेली आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणताही तक्रार दाखल झालेली नाही. समाजवादी पार्टीने मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या कृत्याचा निषेध केला आहे. मंदिर हे एक धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती मंदिरास भेट देऊ शकते. सैयदा यांना स्थानिक लोकांनी आमंत्रित केले होते. मंदिर परिसरात गंगाजल शिंपडणे हे फार चुकीचे आहे, असे समाजवादी पार्टीचे सिद्धार्थनगरचे जिल्हाध्यक्ष लालजी यादव म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sp mla saiyada khatoon visited temple bjp activist purified it by gangajal prd
Show comments