महेश सरलष्कर
विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाच्या कामकाजाचे १०० तास वाया गेले आहेत. कुठल्याही विषयावर नियमांतर्गत चर्चा होऊ शकते. पण, राज्यसभेला शाळा बनवू नका’, अशी सज्जड समज सोमवारी सभापती जगदीप धनखड यांनी वरिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षांच्या सदस्यांना दिली. विरोधकांच्या ‘बेशिस्ती’वर धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यसभेत विरोधकांनी चिनी घुसखोरीच्या चर्चेचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला.
‘विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंनी आणि त्यांच्या कार्यालयाने संसदेच्या कामकाजाच्या नियमांचा अधिक अभ्यास केला पाहिजे’, अशी सूचनाही धनखड यांनी केली. धनखडांच्या या ‘शिकवणी’मुळे प्रामुख्याने काँग्रेसचे सदस्य संतप्त झाले होते. विरोधी पक्षनेते खरगे बोलण्यासाठी उभे राहिले होते. मात्र, धनखडांनी त्यांना लगेच बोलू न दिल्यामुळे काँग्रेसचे सदस्य नासीर हुसेन यांनी, ‘खरगे केव्हापासून बोलण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे धनखड यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर, ‘तुम्ही खरगेंचे प्रवक्ता असल्यासारखे का बोलत आहात, सभागृह कसे चालवायचे हे तुम्ही मला सांगणार का’, असा प्रतिप्रश्न करत हुसेन यांना धनखड यांनी आसनावर बसण्यास सांगितले.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मी इथे पाच मिनिटे उभे राहून तुमचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा: कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीत तरुण नेतृत्वाचा प्रभाव
सभापतींकडे संविधानाने विशेषाधिकार दिले आहेत, त्या अधिकाराचा वापर करून कुठल्याही विषयावर चर्चा करण्याची अनुमती दिली जाऊ शकते! त्यावर, ‘खरगे तुम्ही खूप अनुभवी आहात. मी तुमचे बोट धरून शिकू शकतो’, असे धनखड खरगेंना म्हणाले. पण, आक्रमक झालेल्या खरगेंनी, ‘त्या अनुभवाचा आता सभागृहात काही उपयोग होईनासा झाला आहे’, अशी मार्मिक टिप्पणी केली! ‘नियमांतर्गत नोटीस दिली नसल्याने चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकत नसल्याचे उपसभापती म्हणाले होते. पण, त्यातून चुकीचा अर्थ प्रसारमाध्यमांपर्यत आणि लोकांपर्यंत जात आहे. विरोधी पक्षांचे सदस्य नियम वाचत नाहीत, त्यांना कामकाज कसे चालते हे माहिती नसते, असा गैरसमज पसरू शकतो. त्यामुळे सभापतींचे लक्ष वेधू इच्छितो की, सभापतींनी विशेषाधिकाराचा वापर करावा’, असाही मुद्दा खरगेंनी उपस्थित केला.
खरगेंनी ब्रिटनच्या संसदेतील उदाहरण दिल्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये बाचाबाचीही झाली. ‘फक्त पुरुषाची स्त्री आणि स्त्रीचा पुरुष करता येत नाही एवढेच. बाकी सभापतींकडे इतके विशेषाधिकार असतात की ते काहीही करू शकतात!’, असे खरगे म्हणाल्यामुळे सभागृहात दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये बाचाबाची झाली. सभागृहाचे गटनेते पीयुष गोयल यांनी, ‘खरगेंसारखे वरिष्ठ सदस्य सभागृहाची प्रतिष्ठा धुळीला मिळवत आहेत’, असे म्हणत खरगेंच्या विधानावर आक्षेप घेतला.
हेही वाचा: अमरावती जिल्हा बँकेच्या कारभारावरून राजकीय बाण; आमदार बच्चू कडू आक्रमक
राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची जोरदार मागणी केली. यासंदर्भात नोटिसा देऊनही दखल घेतली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे नासीर हुसेन, रंजीत रंजन यांनी सोमवारी नोटिस दिली. सभागृहाचे कामकाज स्थगित करून या मुद्द्यावर नियम २६७ अंतर्गत चर्चा होऊ शकत नसल्याचा धनखड यांनी वारंवार सांगितले. त्यामुळे आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली व त्यानंतर, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, द्रमूक, समाजवादी पक्ष आदी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.