दयानंद लिपारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे मराठवाड्यामध्ये आगमन होत असताना कोल्हापुरात त्याची विशेष तयारी केली आहे. यात्रेच्या वातावरण निर्मितीसाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी मोठमोठे फलक उभारण्यात आले आहेत. यात्रेत सहभागी होताना कोल्हापुरी कुस्तीचे प्रदर्शन, पारंपरिक वाद्याचा गजर केला जाणार आहे.

दक्षिण भारतातून सुरू झालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये येत आहे. नांदेड जिल्ह्यात यात्रेचे आगमन होत असताना पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात यात्रेच्या प्रसाराच्या निमित्ताने विशेष नियोजन करण्यात आले आहे. गेल्या महिन्यापासून यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका, फेरी, संघटन सुरू झाले आहे. यात्रेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीही करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : ‘भारत जोडो’ यात्रेत ३० हजारांहून अधिक वैदर्भीय सहभागी होणार

यात्रेमध्ये सुमारे दहा हजार कार्यकर्त्यांचा सहभाग असावा असे नियोजन जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. हे सर्व कार्यकर्ते कोल्हापुरी फेटा आणि कोल्हापूर काँग्रेसचा उल्लेख असलेले टी-शर्ट घालून यात्रेत सहभागी होणार आहेत. याचवेळी कोल्हापूरचे वैशिष्ट्य असलेले कोल्हापुरी कुस्तीचे प्रदर्शन, तसेच लाठीकाठीचा मर्दानी खेळ सादर केला जाणार आहे. ढोलताशा, लेझीम पथक याचा गजर करीत यात्रेत उत्साही वातावरण निर्मिती केली जाणार आहे.

हेही वाचा : प्रकाश आबिटकर : विकास आणि जनतेशी नाळ

शहरात विविध ठिकाणी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणारे फलक उभारण्यात आले आहे. मोटारीपासून ते बसपर्यंत विविध प्रकारच्या चार चाकी वाहनातून १० व ११ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील काँग्रेस कार्यकर्ते मराठवाड्याकडे जाणार आहेत. यामध्ये युवकांचा अधिकाधिक सहभागी असावा यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी संपर्क यंत्रणा वाढवली आहे. यात्रा मराठवाड्यात येणार असली, तरी वातावरण निर्मिती कोल्हापुरात करण्यात काँग्रेसने लक्षणीय पुढाकर घेतला असल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special preparations in kolhapur on the occasion of bharat jodo yatra congress leader rahul gandhi marathwada vidarbha print politics news tmb 01