महेश सरलष्कर
भाजपच्या प्रतिमा बदलाच्या प्रयोगामध्ये मुस्लिमांमधील मागास आणि अतिमागासांपर्यंत (पसमांदा) पोहोचण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणानुसार दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच चार पसमांदा मुस्लिमांना भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे.
‘भाजपने दिल्ली महापालिका निवडणुकीत नेहमीच चार-पाच मुस्लिमांना उमेदवारी दिली पण, यावेळी पहिल्यांदाच ओबीसी मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी दिलेल्या पसमांदा मुस्लिमांच्या चारही प्रभागांमध्ये ८० टक्के मतदार ओबीसी-दलित मुस्लिम समाजातील आहेत. एका मुस्लिम उमेदवाराने जरी निवडणुकीत विजय मिळवला तरी, भाजपचा पसमांदा मुस्लिमांशी जोडून घेण्याचा मार्ग सुकर होऊ शकेल’, अशी आशा राष्ट्रवादी मुस्लिम पसमांदा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपचे नेते आतिफ रशीद यांनी व्यक्त केली.
भाजपच्या हैदराबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पसमांदा मुस्लिमांना भाजपच्या परीघात आणण्याचे उद्दिष्ट भाजपच्या नेत्यांसमोर ठेवले होते. त्याचाच भाग म्हणून यावेळी दिल्ली महापालिकेत पसमांदा मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांत लोकसभा तसेच, विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मुस्लिमांना उमेदवारी दिली नाही. आगामी लोकसभा निवडणुकीतही मुस्लिमांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नसली तरी, हिंदूंमधील ओबीसी आणि दलितांप्रमाणे मुस्लिमांमधील ओबीसी-दलितांना मतदार बनवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत.
हेही वाचा: कोल्हापूर जिल्हा भाजपमधील दुफळी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर उघड
मुस्लिमांमधील मागास राहिलेल्या ओबीसी-दलित समाजाला पसमांदा मुस्लिम म्हटले जाते. देशातील सुमारे १९ टक्के मुस्लिम लोकसंख्येत ८०-८५ टक्के पसमांदा मुस्लिम आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली, केरळ, झारखंड या राज्यांमध्ये पसमांदा मुस्लिमांची मते निर्णायक ठरू शकतात . भाजप मागास-अतिमागास मुस्लिमांपर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मग, आम्ही मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप का केला जात आहे’, असा सवाल आतिफ रशीद यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये ३.५ कोटी तर, बिहारमध्ये १.५ कोटी पासमांदा मुस्लिम आहेत.
हेही वाचा: सोलापुरात विमानसेवेवरून काडादी – विजयकुमार देशमुख यांच्यात शीतयुद्ध; पक्षीय राजकारण सुरू
गोहत्या आणि गोमांस विक्रीच्या कथित आरोपांमध्ये अन्सारी, कुरेशी समाजातील लोकांना मारहाण केल्याच्या अनेक घटना झाल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझर धोरणाचा सर्वाधिक फटका पसमांदा मुस्लिमांना बसलेला आहे. पण, मोदींच्या ‘सूचने’नंतर, पसमांदा मुस्लिमांपर्यंत केंद्राच्या सरकारी योजना पोहोचवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. पसमांदा मुस्लिमांशी संपर्क-संवाद वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशात लखनौसह सहा ठिकाणी पसमांदा मुस्लिमांच्या परिषदा घेण्यात आल्या आहेत. पसमांदा मुस्लिमांना स्नेह आणि सन्मान मिळाला पाहिजे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे म्हणणे आहे.