परभणी : गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जाहीर आरोप-प्रत्यारोप झाले असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर व माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी एकमेकांवर आरोप करत राजकीय टीका केली आहे. बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याला संधी मिळाली असली तरी बाजार समितीवर वर्चस्व मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे, अशी स्थिती या निवडीच्या निमित्ताने निर्माण झाली.
बाजार समितीच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत असतानाही तीन सदस्य फुटल्याने महाविकास आघाडीची सत्ता शेवटच्या क्षणी हातून गेल्याचे सांगत या सदस्य फुटीचे मुख्य सूत्रधार राजेश विटेकर हेच असल्याचा आरोप माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी पत्रकार बैठकीत केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, तालुकाप्रमुख अनिल सातपुते, राष्ट्रवादीचे युवा नेते ॲड. मिथिलेश केंद्रे आदींची यावेळी उपस्थिती होती.
केंद्रे म्हणाले, गंगाखेड बाजार समिती निवडणुकीत मतदारांनी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात कौल देत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत दिले होते. महाविकास आघाडीने साहेबराव भोसले यांना सभापतिपदासाठी प्राधान्यही दिले होते. तसेच जिल्ह्याच्या नेत्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना आपसात बसून निर्णय घ्या, असे सांगत सर्वाधिकार दिले होते. सर्व काही ठीक असताना राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक म्हणवून घेणारे माजी जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर यांनी या निवडणुकीत आमदार रत्नाकर गुट्टे यांना जाहीर मदत केल्याचा आरोप केंद्रे यांनी केला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव भोसले यांचे वडील साहेबराव भोसले यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून माधव भोसले यांनी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा पक्षाकडून त्यांची हकालपट्टी करण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे धाव घेणार असल्याचे डॉ. केंद्रे यांनी सांगितले.
केंद्रे यांच्या आरोपांना राजेश विटेकर यांनी उत्तर दिले. बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबराव भोसले यांची निवड झाली आहे. त्यासाठी आम्ही गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची मदत घेतली. एका प्रामाणिक व निष्ठावंत अशा ज्येष्ठ कार्यकर्त्याला सभापतीपदी बसवल्याचे आम्हाला समाधान आहे. याउलट राष्ट्रवादीचा सभापती होऊ नये म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर व माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनीच कटकारस्थान चालवले होते, असा आरोप विटेकर यांनी केला. गंगाखेड बाजार समितीच्या निवडणुकीत आपण सभापतीपदासाठी फुट केल्याचा आरोप करणाऱ्या केंद्रे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात काम केले आहे. आपण स्वतः जेव्हा २०१९ यावर्षी लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार होतो तेव्हा केंद्रे यांनी आपल्या विरोधात काम केल्याचा आरोपही त्यानी केला.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापनेसाठी आमदार गुट्टे यांनी त्यावेळी तीन सदस्यांची मदत केली होती त्याची परतफेड आम्ही यावेळी बाजार समितीत गुट्टे यांना सोबत घेऊन केली, असेही विटेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी विटेकर यांच्यासमवेत नवनिर्वाचित सभापती भोसले यांच्यासह माजी सभापती बाळ चौधरी व राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी हजर होते. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार केंद्रे व विद्यमान आमदार गुट्टे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. महाविकास आघाडीच्या वर्चस्वाखालील सभापती होऊ नये यासाठी गुट्टे यांनी केलेली खेळी यशस्वी झाली. त्याचवेळी विटेकर यांनाही केंद्रे यांचा वचपा काढण्याची संधी या निमित्ताने मिळाली. सध्या गंगाखेड बाजार समितीच्या सभापतीपदी चेहरा जरी राष्ट्रवादीचा असला तरी वर्चस्व मात्र गुट्टे यांचे आहे. स्पष्ट बहुमत नसतानाही आपल्या मर्जीतील सभापती व आपल्या समर्थकास उपसभापतीपद देण्यात गुट्टे यशस्वी झाले.
हेही वाचा – कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये ‘पैशांचा पाऊस’
गंगाखेड बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीपदाच्या निवडीच्या एक दिवस आधी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. एकूण १८ जागांपैकी १० जागांवर वर्चस्व मिळवत महाविकास आघाडीने स्पष्ट बहुमत संपादन केले होते तर गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला आठ जागा मिळाल्या होत्या. सभापती-उपसभापती महाविकास आघाडीचेच होणार हे स्पष्ट असताना निवडीने अचानक वेगळे वळण घेतले. महाविकास आघाडीच्या मतांमध्ये चक्क फूट पडली होती. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नेत्यांनी गुट्टे यांच्याशी सलगी सुरू केली असल्याची कुणकुण राष्ट्रवादीतल्या एका गटाला लागली. गुट्टे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्यात पडद्याआड नवी समीकरणे सुरू असल्याचे बोलले जाऊ लागले. याच दरम्यान महाविकास आघाडीच्या अन्य काही नेत्यांनी थेट गुट्टे यांच्याशी संधान साधले. ज्येष्ठ संचालक साहेबराव भोसले, सुशांत चौधरी, मनकर्णाबाई घोगरे हे महाविकास आघाडीचे तीन सदस्य गुट्टे यांच्या गोटाला जाऊन मिळाले. त्यापैकीच साहेबराव भोसले यांची सभापतीपदी वर्णी लागली. महाविकास आघाडीच्या सभापतीपदाच्या उमेदवारालाच आपल्या गोटात घेऊन गुट्टे यांनी सभापतीपद दिले. त्याचबरोबर स्वतःच्या कट्टर समर्थकास उपसभापतीपदी विराजमान होण्याची संधी प्राप्त करून दिली. मात्र या निवडीने राष्ट्रवादीतील दोन नेत्यांचे मतभेद जाहीररीत्या चर्चेत आले.