मुंबई : विधान परिषद निवडणुकीनंतर बंडाचा झेंडा उभारणारे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचे चित्र असले तरी विधिमंडळाच्या नियमावलीनुसार एकनाथ शिंदे यांना मुंबईत विधानसभेच्या उपाध्यक्षांसमोर आपल्या बाजूने ३७ आमदार असल्याचे सिद्ध करावे लागेल व त्यानंतरच शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे कारण सांगत एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारला. गेल्या ४८ ता्सांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या शिवसेना आमदारांची संख्या वाढत असून शिंदे यांच्याकडे गुवाहाटीला जाऊन सामील झालेल्या मंत्र्यांचे व आमदारांची छायाचित्रे माध्यमांवर झळकत आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचे पत्र बुधवारी मुंबईत विधानसभा उपाध्यक्षांना व राज्यपालांना पाठवले. त्यावरील सह्यांची संख्या पाहता शिवसेनेच्या ५५ पैकी बहुसंख्य आमदारांची एकनाथ शिंदे यांना साथ असल्याचे दिसते. त्यानंतर बुधवारी रात्री पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व इतर आमदार तर गुरुवारी सकाळी दीपक केसरकर, सदा सरवणकर आदी आमदार गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले.

मात्र विधिमंडळाच्या नियमावलीनुसार एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी किंवा अन्य कोठुनही आमदारांच्या सह्यांच्या आधारे पत्र पाठवले अथवा दोन तृतीयांश म्हणजेच शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या ५५ पैकी ३७ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला तरी त्यास अर्थ नसतो. विधिमंडळात येऊन एकनाथ शिंदे यांना या ३७ किंवा त्यापेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा सिद्ध करावा लागेल. त्यानंतरच शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडल्यावर शिक्कामोर्तब होईल, असे विधिमंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader