नगर : श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार बबनराव पाचपुते यांचे प्राबल्य असूनही सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना ३१ हजार मतांची पिछाडी सोसावी लागली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विलक्षण राजकीय घडामोडी घडलेल्या मतदारसंघात शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) अनुराधा नागवडे, भाजपचे विक्रमसिंह पाचपुते, राष्ट्रवादीचे (शरद पवार) बंडखोर माजी आमदार राहुल जगताप व पूर्वाश्रमीचे विखे समर्थक परंतु सध्या ‘वंचित बहुजन आघाडी’कडून लढणारे अण्णासाहेब शेलार यांच्यामध्ये चौरंगी लढत आहे.
श्रीगोंदा मतदारसंघावर बबनराव पाचपुते यांनी वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून प्रदीर्घकाळ वर्चस्व ठेवले. तरीही लोकसभा निवडणुकीत भाजप पिछाडीवर पडला. आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाने त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र ती त्यांनी नाकारत चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते यांच्या गळ्यात माळ घालणे पक्षाला भाग पाडले. त्यातून पक्षाच्या निष्ठावंत सुवर्णा पाचपुते यांनी बंडखोरी केली. महाविकास आघाडीत मतदारसंघासाठी ठाकरे गट व राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यामध्ये रस्सीखेच झाली. गेल्या वर्षभरात उमेदवारीचा कानोसा घेत तीनवेळा पक्ष बदललेल्या व ऐनवेळी ठाकरे गटात दाखल झालेल्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळाली. त्याच्या परिणामातून लगतचा अहिल्यानगर शहर मतदारसंघ ठाकरे गटाकडून निसटला आणि तो राष्ट्रवादीकडे गेला.
हेही वाचा >>>अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्याचे आव्हान
२०१४ मध्ये विजयी झालेले राहुल जगताप यांच्यासाठी शरद पवार पुन्हा आग्रही होते. मात्र जागा न मिळाल्याने जगताप यांना उमेदवारीवर पाणी सोडावे लागले. परिणामी त्यांनी बंडखोरी केली. पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. तसेच ते शरद पवारांचे नाव घेऊन प्रचार करत आहेत, त्यामुळे पक्षाचा त्यांना छुपा पाठिंबा आहे काय, असाही प्रश्न निर्माण झालेला आहे.
निर्णायक मुद्दे
● श्रीगोंदा तालुका पाटपाण्याने समृद्ध. पूर्वी चार साखर कारखाने होते. तरीही बाहेरच्या कारखान्यांना ऊस पाठवला जातो. पुणे जिल्ह्यातील कुकडी, घोड धरण समूहाचे पाणी कालव्याद्वारे उपलब्ध होते. मात्र पुण्यातील नेत्यांच्या वर्चस्वामुळे अन्याय होत असल्याची भावनाही आहे. श्रीगोंदे व अहिल्यानगर तालुक्यातील ३२ गावांच्या पाण्याचा, साखळाई उपसा सिंचन योजनेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. त्याकडे कोणी लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाहीत.
लोकसभेतील राजकीय चित्र
महाविकास आघाडी – १,१८,९६० महायुती – ८६,२४९