पुणे/पिंपरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्वती आणि मावळ मतदारसंघातील महायुतीचे इच्छुक उमेदवार श्रीनाथ भिमाले आणि बापूसाहेब भेगडे यांची महामंडळावर नियुक्ती करून संभाव्य नाराजी दूर करण्याचे महायुतीचे प्रयत्न फसण्याची शक्यता आहे. या दोघांनीही महामंडळावरील नियुक्तीला नकार दिला असून, ‘महामंडळ नको, विधिमंडळ द्या,’ अशी मागणी करून आगामी निवडणूक लढविण्यासंदर्भात ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत गुंताही वाढणार आहे.
पर्वतीच्या विद्यामान आमदार माधुरी मिसाळ यांच्याविरोधात माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी दंड थोपटले आहेत. ‘लढणार आणि जिंकणार’ असा विश्वास व्यक्त करून भिमाले यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र, त्यांची राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर, मावळमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन समितीच्या उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांना महामंडळे देऊन त्यांच्या नावावर महायुतीने फुली मारल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली होती. मात्र, या दोघांनीही महामंडळाच्या नियुक्तीला नकार दिला आहे. त्यामुळे महायुतीतीत पेच वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा >>>कौटुंबिक कलह टाळण्यासाठी भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांची माघार
‘महामंडळावरील नियुक्तीसंदर्भात कोणतेही अधिकृत पत्र मिळालेले नाही. तसेच दूरध्वनी किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून मला तसे कळविण्यात आलेले नाही. भाजपकडे मी पर्वती विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे आणि त्या मागणीवर मी ठाम आहे,’ असे भिमाले यांनी स्पष्ट केले. महायुतीत ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ, असे सूत्र ठरले आहे. त्यामुळे मावळची जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे कायम राहण्याची शक्यता आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला स्थापनेपासून यश येत नव्हते. त्यामुळे २०१९ मध्ये भाजपमधून आलेले सुनील शेळके यांना ऐन वेळी राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. पक्षातील फुटीनंतर शेळके अजित पवार यांच्यासोबत कायम राहिले. त्यांचे प्रतिस्पर्धी ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे हेही राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात राहिले. ‘एकालाच दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने अपयश येते. त्यामुळे या वेळी उमेदवार बदलला पाहिजे,’ अशी भेगडे यांची भूमिका आहे.
हेही वाचा >>>नांदेड पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी, सहानुभूतीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न
तसेच आमदार शेळके यांनी एकदाच संधी मागितली होती, असाही भेगडे यांचा दावा आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास भेगडे अपक्ष लढतील किंवा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या ३० वर्षांपासून राजकीय जीवनात सक्रिय आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत मला प्रत्येक वेळी थांबविण्यात आले. मात्र, या वेळी मलाच संधी मिळेल. – श्रीनाथ भिमाले
पक्षाकडे कोणतेही पद किंवा महामंडळ मागितले नव्हते. केवळ उमेदवारी मागितली असून, त्यासाठी मी आग्रही आहे. – बापूसाहेब भेगडे