राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ कार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांच्या एका वक्तव्यावरून राजकीय आरोपांच्या फैरी झडत आहेत. समाजवादी पक्षाचने नेते एस. टी हसन यांनी होसबळे यांच्या वक्तव्याबाबत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. शूद्र आणि द्रविड यांना वगळलं गेलं तर भारतात राहणारे सगळेच लोक विदेशातून आले आहेत. सवर्ण हिंदूही विदेशातूनच भारतात आले आहेत असंही एस. टी. हसन यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं आहे एस. टी. हसन यांनी?
एस. टी. हसन यांनी असं म्हटलं आहे की १ हजार वर्षांपूर्वी जर मुस्लिम हिंदुस्थानात आले तर सवर्ण हिंदूही दोन हजार वर्षांपूर्वी मध्य आशियातून भारतात आले आहेत. भारतात राहणारे मूळ रहिवासी हे द्रविड आणि शूद्र आहेत. शूद्र आणि दलित हे भारताचे खरे मूळ रहिवासी आहेत जे जंगलात राहात होते. मध्य आशियातून आलेल्या लोकांनी हिंदू धर्म वाढवला हा इतिहास आहे. हिंदू आणि आर्य हे बाहेरून आले आहेत असं हसन यांनी म्हटलं आहे. आपल्या देशात विविधेतच एकता आहे. माझं मत असं आहे सगळ्यांना जन्म देणारा ईश्वर एकच आहे. मात्र सगळ्यांची पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे.
आपला देश विविधेतून एकता असणारा देश आहे. आपण हा जो आदर्श जगापुढे ठेवला आहे तो आदर्श मोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्ही या ठिकाणी सोबत आहोत. सगळ्यांनी मिळूनच या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे हे विसरता येणार नाही. आपल्या देशात जो हक्क हिंदूंचा आहे तोच हक्क मुस्लिमांनाही आहे. दत्तात्रय होसाबळे यांच्या घरवापसीच्या वक्तव्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
दत्तात्रय होसाबळे यांनी काय म्हटलं होतं?
भारत हे हिंदू राष्ट्र आहे. कारण ज्यांनी हा देश घडवला आहे ते हिंदूच आहे. कुणी नाईलाजाने गोमांस खाल्लं असेल पण त्यांना आपण आपल्या धर्माचे दरवाजे बंद करू शकत नाही असं वक्तव्य होसाबळे यांनी केलं होतं. त्या वक्तव्यावर आता एस. टी हसन यांनी उत्तर दिलं आहे.