तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव ऊर्फ केसीआर आणि भारत राष्ट्र समिती या पक्षाचे सर्वेसर्वा यांचा केंद्रीय यंत्रणांशी वाद सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या कन्या- विधान परिषदेच्या आमदार के. कविता यांच्यावर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई होत असल्याबाबत पक्षाकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दिल्लीतील अबकारी धोरणावरून के. कविता यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. या सर्व परिस्थितीतही केसीआर यांचे महाराष्ट्रावर लक्ष आहे. राज्यात पक्ष वाढविण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्रात बीआरएसचा प्रसार करण्यासाठी पक्षाकडून मुख्यमंत्री केसीआर यांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे. येत्या २६ मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील कंधार लोहा येथे केसीआर यांची जाहीर सभा घेतली जाणार आहे. हा मतदारसंघ तेलंगणाच्या सीमेवर असून या मतदारसंघात तेलगू भाषिकांची मोठी संख्या आहे. पुढील काही महिन्यांत नांदेड आणि उर्वरित महाराष्ट्रात विविध नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने बीआरएस आपल्या जनाधाराची चाचणी घेऊ पाहत आहे. ५ फेब्रुवारी रोजी केसीआर यांनी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जाहीर सभा घेतली होती.
हे वाचा >> भाजपविरोधात काँग्रेसच्या मदतीला ‘बीआरएस’, ‘आप’
बीआरएस पक्षाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे पक्षाची राज्यात नोंदणी केली आहे. तसेच निवडणुकीकरिता चारचाकी हे चिन्ह मिळावे, अशीही मागणी केली आहे. बीआरएसमधील सूत्रांनी सांगितले की, कंधार लोहा येथे होणाऱ्या जाहीर सभेत निरनिराळ्या पक्षांतील अनेक कार्यकर्ते, नेते बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.
१ मार्च रोजी, केसीआर यांनी महाराष्ट्राच्या सहा विभागांतील समन्वयकांच्या नावांची घोषणा केली होती. नाशिक विभागासाठी दशरथ सावंत, पुणे विभागासाठी बाळासाहेब जयराम देशमुख, मुंबईसाठी विजय मोहिते, औरंगाबादसाठी सोमनाथ थोरात, नागपूरसाठी ज्ञानेश वाकुडकर आणि अमरावती विभागासाठी निखील देशमुख यांच्या नावांची घोषणा केली होती. तसेच किसान सेल विभागाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माणिक कदम यांची नियुक्ती करण्यात आली होती.
बीआरएसचे समर्थक असा दावा करतात की, पक्षाचे धोरण आणि केसीआर यांची दूरदृष्टी ही देशातील अनेक नेत्यांना भावत आहे. बीआरएसच्या धोरणांमुळे लोकांच्या जीवनात सकारात्मक आणि आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे अनेक पक्षांतील नेते बीआरएसकडे आकृष्ट होत आहेत. तसेच फेब्रुवारी महिन्यात नांदेडमध्ये झालेल्या सभेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. बीआरएसच्या एका नेत्याने सांगितले की, जनतेच्या विकास आणि कल्याणासाठी केसीआर यांनी तेलंगणामध्ये ज्या योजना आणि धोरण राबविले, त्यामुळे अनेक राज्यांतील लोक पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी यापूर्वीच बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे, असेही या नेत्याने सांगितले. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या किसान सेलचे माजी अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार नागनाथ घिसेवाड, नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ता पवार, युवक प्रदेश सचिव शिवराज धोंडगे, प्रवक्ते सुनील पाटील, लोहाचे अध्यक्ष सुभाष वाकोरे, कंधारचे अध्यक्ष दत्ता खरमांगे आणि जिल्हा परिषद सदस्य, तसेच इतर नेत्यांनी केसीआर यांची हैदराबाद येथे भेट घेतली, अशीही माहिती त्याने दिली. या बैठकीत केसीआर यांनी बीआरएसचे भविष्यातील नियोजन, रणनीती सांगितली. कंधार लोहा येथील जाहीर सभेत राष्ट्रवादीचे नेते आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याचे आश्वासन या बैठकीत केसीआर यांना देण्यात आले.