दयानंद लिपारे
कोल्हापूर: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरूच राहिली. निवडणूक काळामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचे प्रचारात वर्चस्व राहिल्याचेही दिसून आले. याचवेळी सीमावासियांचा रोषाचा फटकाही या नेत्यांना सहन करावा लागला.
कन्नड भूमीतील निवडणुकीचा प्रचार राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या प्रचाराची दिशा, वक्तव्य यामुळे गाजला. याचवेळी रेशमसाठी प्रसिद्ध असलेल्या या राज्यात महाराष्ट्रातील नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांने कडवडपणा आला. मागील आठवड्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत राजकारणावरून ‘ भाजपशी राष्ट्रवादीची बोलणी सुरू आहे,’असे खळबळजनक विधान केले होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘नाना पटोले यांना काँग्रेस पक्षात कोणी गांभीर्याने घेत नाहीत,’ असे म्हणत वादाला फोडणी टाकली होती. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. ‘काँग्रेसची दलाली करण्यासाठी राऊत सीमाभागात आले आहेत’, असे म्हणत फडणवीस यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिले होते.
अखेरच्या टप्प्यातही वाद
आरोप प्रत्यारोपांची राळ संपेल असे वाटत असताना त्यानंतरही महाराष्ट्रातील नेत्यांची एकमेकांना विरोधात तोफ धडाडत राहिली. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत शाब्दिक वादाला उधान आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी निपाणी मध्ये ‘ राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. तो कर्नाटकात काय डोंबल करणार. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या,’ अशा शब्दात खिल्ली उडवली होती. या विधानाचा संदर्भ घेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल प्रचाराची सांगता होत असताना ‘ भाजपने तुम्हाला फौजदाराचा हवालदार केला आहे. आणि तुम्ही आमची मापे कशाला काढता,’ अशा शब्दात फडणवीस यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ कर्नाटक राज्यात ४० टक्के हि काय भानगड चालते ते कळेना. भाजप इतकी कर्नाटकचे बदनामी कोणीही केली नाही. ज्यांची देशात सत्ता, त्यांना मणिपूरसारखं राज्य सांभाळता येत नाही,’ अशा शब्दात केंद्रावर निशाणा साधला. अजित पवार यांनी वरळीतील सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटकातील सभेवर टीकास्त्र डागले. ‘ यांना महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही. मग कर्नाटकात कोण ओळखणार. शिंदेंचे भाषण सुरू झाले की प्रचार सभेतील खुर्च्या रिकाम्या होत राहिल्या,’ असी खिल्ली उडवली.
एकीकरण समितीचा रोष
महाराष्ट्रातील काँग्रेस व भाजपच्या नेत्यांनी सीमाभागात प्रचाराला येऊ नये. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने या पक्षांना दिला होता. निवेदन देवून न थांबता एकीकरण समितीने तो कृतीतही आणला . त्याचा फटका देवेंद्र फडणवीस, प्रणिती शिंदे यांना बसला. बेळगाव येथील सभेवेळी देवेंद्र फडणवीस यांना एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. आंदोलकांची घरपकड करण्याची वेळ पोलिसांवर आली. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची सभा सुरू होण्यापूर्वी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून सभा उधळून लावली.
बड्या नेत्यांचे बळ
सीमाभागात उद्धव ठाकरे यांनी आधीपासूनच महाराष्ट्र एकीकरण समिती सोबत राहण्याची भूमिका घेतली होती. निपाणीची सभा वगळता राष्ट्रवादी काँग्रेसने सीमाभागातील एकीकरण समितीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. फडणवीस यांना आलेला अनुभव लक्षात घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकात दाखल झाल्यावर आपले पत्ते खुले करताना सीमाभागात एकीकरण समितीला आणि अन्यत्र भाजपाला पाठींबा दिला. अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्रातील या बड्या नेत्यांची ही भूमिका एकाकी लढणाऱ्या एकीकरण समितीला बळ देणारी ठरली.
आणखी वाचा- कर्नाटक जिंकण्यासाठी काँग्रेसच्या चार खैरातींवर भाजपची मदार
मनसेचे आवाहन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन केले होते. काही वेळातच त्यांनी सीमाभागातील मराठी उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन केले. काही तासातच ठाकरे यांनी आपली भूमिका बदलल्याने त्याचे राज काय, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने नाराजी व्यक्त केली. समाज माध्यमातून टीकात्मक शेरेबाजी सुरु झाली.