नागपूर: राष्ट्रवादीत फूट पडल्यावर प्रथमच पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘घड्याळ जुनीच, पण वेळ नवी’ अशी घोषणा दिली. काही तरी नवीन करण्यासाठी वेगळी भूमिका घेतली हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यासोबतचे नेते व कार्यकर्ते हे मूळ राष्ट्रवादीचेच होते आणि फलकावर लावलेल्या पक्षाचे बोधचिन्ह घड्याळ आणि त्यातील वेळही जुनीच होती. त्यामुळे या दौऱ्याचे वर्णन घड्याळही जुनी आणि वेळही तीच असे करावे लागेल.
राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत आहे, या गटाचे एक मंत्री पूर्व विदर्भातील म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल गोंदियाचे आहेत. त्यामुळे धुमधडाक्यात हा दौरा होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही. तटकरे यांनी विदर्भात पक्ष न वाढण्यासाठी २५ वर्षे या भागाकडे दुर्लक्ष झाल्याचे मान्य केले. ‘घड्याळ तीच, वेळ नवी’ ही घोषणा दिली आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार नाही, हे सुद्धा त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी एकसंघ असताना आणि अडिच दशकाहून अधिक काळ सत्तेत असताना या पक्षाला विदर्भात आपली मुळे घट्ट करता आली नाही. असे असले तरी शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग विदर्भात आहे. त्यामुळे तटकरे यांच्याकडून पवार यांना लक्ष्य केले जाईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. ती करताना जातीचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे तटकरेंवरच टीका होऊ लागली आहे. विदर्भात पक्ष संघटना न वाढण्यामागे या भागाकडे दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा उपस्थित करताना तटकरेंचा रोख या भागातील शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्याकडे होता. पण अनिल देशमुखच पूर्व विदर्भाचे नेते नव्हते तर सध्या तटकरे यांच्यासोबत असलेले व केंद्रात अनेक वर्षे मंत्रीपद भोगलेले वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे याच भागातील आहे. त्यामुळे विदर्भाकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्यात या दोन नेत्यांचाही तितकाच वाटा आहे हे तटकरे विसरले. खुद्द तटकरे यांनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली त्या काळात त्यांनी विदर्भासाठी काय केले, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.
आता अजित पवार यांचे पर्व सुरू झाले, असे तटकरे म्हणाले. पण विदर्भातील सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवार यांची प्रतिमा मलीन झाली आहे. पक्षाची सूत्रे अजित पवार यांच्याकडे असताना त्यांनी कंत्राटदारांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणले होते. या भागातील लोक ही बाब विसरले नाहीत. घड्याळ जुने वेळ नवी असे ते म्हणतात पण त्यांच्यासोबत बहुतांश जुनेच नेते व कार्यकर्ते दिसून आले. सत्तेत असणाऱ्यांसोबत कायम असणारा एक वर्ग प्रत्येक पक्षात असतो, अजित पवार गटासोबत दिसणारे नेेते, कार्यकर्ते त्याच वर्गातील आहेत, नवीन कार्यकर्ते जोडणारा एकही नवा नेता सध्यातरी तटकरे यांच्या गटाकडे गेल्या सहा महिन्यात आला नाही. त्यामुळे त्यांची ‘नवी वेळ’ ही घोषणाही सध्यातरी सुसंगत वाटत नाही.