चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रथमच आदिवासी पालकमंत्री या जिल्ह्याला मिळाला आहे. दरम्यान १५ वर्षानंतर बाहेर जिल्ह्याचा पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोपविल्याने औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यातील वाढते प्रदूषण, पर्यावरण, मानव – वन्यजीव संघर्ष, बेरोजगारी, आरोग्य तथा इतर गंभीर समस्या व प्रस्न जिव्हाळ्याने सोडविणार का ? हा प्रश्र्न राजकीय वर्तुळात आहे. तसेच जिल्ह्यातील भाजपच्या पाच आमदारांची मर्जी सांभाळताना देखील पालकमंत्र्यांची कसरत होणार आहे ही देखील चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. लगतच्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदार संघातून निवडून आलेले भाजपचे आमदार अशोक उईके शांत स्वभावाचे ओळखले जातात. जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. मुनगंटीवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. तेव्हाच या जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री मिळणार हे स्पष्ट झाले होते. त्यातही आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे नाव आघाडीवर होते. मागील पंधरा वर्षांत प्रथमच हा जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. या जिल्ह्याने श्रावण पराते, रणजित देशमुख, एकनाथ गायकवाड, अनिस अहमद तथा रमेश बागवे हे बाहेरचे पालकमंत्री बघितले आहेत. तसेच १९९५ मध्ये मनोहर जोशी सरकारच्या काळात जिल्ह्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांना कॅबिनेट मंत्री केले. आणि त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. त्यानंतर १९९९ ते २००८ अशी सलग नऊ वर्षे हा जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला. आणि या काळात जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी बाहेरच्या व्यक्तीकडे गेली होती. त्यानंतर २०१० मध्ये जिल्ह्याचे संजय देवतळे, २०१४ मध्ये सुधीर मुनगंटीवार, २०१९ मध्ये विजय वडेट्टीवार आणि २०२२ मध्ये सुधीर मुनगंटीवार हे या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. बाहेरचा पालकमंत्री जिव्हाळ्याने काम करीत नाही, २६ जानेवारी गणतंत्र दिवस, १५ ऑगस्ट स्वतंत्र दिन व १ मे महाराष्ट्र दिन या दिवशी केवळ ध्वजारोहनसाठी येतात आणि निघून जातात ही परंपरा आहे. त्यामुळे पालकमंत्री उईके हा इतिहास बदलणार की त्याचं परंपरेला धरून चालणार हे पाहणे अत्स्यूकतेचे ठरणारआहे.

हेही वाचा >>>नव्या पालकमंत्र्यास समतुल्य सहकारी सांभाळण्याचेच आव्हान

दुसरीकडे या जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. त्यातही माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार व आमदार किर्तीकुमार भांगडिया या तिघांमधील सख्य सर्वश्रुत आहे. मुनगंटीवार व जोरगेवार यांच्यात तर कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे या तीन आमदारांशी उईके कशा पद्धतीने जुळवून घेतात यावरच जिल्ह्यातील विकासकामे व इतर सर्व गोष्टी राहणार आहेत. आमदार देवराव भोंगळे व आमदार करन देवतळे नवखे आहेत. मात्र माजी केंद्रीय राज्य मंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री शोभा फडणवीस यांच्याशी देखील उईके यांना जुळवून घ्यावे लागणार आहे. तसेच जिल्ह्यातील पक्ष संघटनांची सर्व सूत्रे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हातात आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांची मर्जी सांभाळावी लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State tribal development minister ashok uike appointed as guardian minister of chandrapur district print politics news amy