गोंदिया : बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दु:खद व गंभीर आहे. सिद्दिकी यांच्याशी माझे राजकीय संबंध तर होतेच माझी स्वत:ची निकटची मैत्रीही होती. या घटनेमुळे आम्हा सगळ्यांना धक्का बसला आहे. हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला लवकरच गजाआड करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गोंदिया जिल्ह्यात रविवारी विविध विकासकामांचे लोकार्पण करण्याकरिता ते आले होते. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येविषयी माहिती देताना ते म्हणाले की, आतापर्यंत मुंबई पोलिसांकडून दोन आरोपी पकडण्यात आले आहे. तिसऱ्या आरोपीच्या शोधात पोलिसांची चार पथके इतर राज्यात जाऊन चौकशी करत आहेत. एक पथक इंदूर तर एक पथक उज्जैनला पाठवण्यात आले आहे. ही गंभीर घटना झाल्यावर विरोधक केवळ राजकारण करत आहे.
हेही वाचा >>>जयंत पाटील यांना घेरण्याचे विरोधकांबरोबरच मित्रपक्षांचेही प्रयत्न
सरकार जबाबदार नाही असे फलक लावण्याची वेळ विजय वडेट्टीवार
महायुती सरकारने राज्यात आता विविध योजनांची जाहिरात करण्यापेक्षा त्यांनी ‘तुमची सुरक्षा तुम्ही करा, सरकार जबाबदार नाही’ असे फलक जागोजागी लावत जाहिरात केली पाहिजे. त्यामुळे नागरिक निदान त्यांची सुरक्षा स्वत: करतील, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यात कायद्याचा आणि पोलिसांचा धाक कुठेही राहिलेला दिसत नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा >>>बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने राष्ट्रवादीला धक्का
३५ वर्षांतील राजकीय हत्या…
१९९०च्या दशकापासून मुंबईत विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी वा पदाधिकाऱ्यांच्या हत्या झाल्या आहेत. यातील काही राजकीय कारणाने तर काही जमिनीच्या वादातून झाल्या आहेत. यातील काही प्रमुख नेत्यांची नावे : ● रामदास नायक (भाजप आमदार) ● प्रेमकुमार शर्मा (भाजप आमदार) ● विठ्ठल चव्हाण (शिवसेना आमदार) ● रमेश मोरे (शिवसेना आमदार) ● रुसी मेहता (काँग्रेस नगरसेवक) ● के. टी. थापा (शिवसेना नगरसेवक) ● केदारी रेडकर (शिवसेना नगरसेवक) ● अशोक सावंत (शिवसेना नगरसेवक) ● जितेंद्र दाभोळकर (सरचिटणीस, अ. भा. सेना) ● नीता नाईक (शिवसेना नगरसेविका) ● आत्माराम बागवे (शिवसेना पदाधिकारी) ● कमलाकर जामसंडेकर (शिवसेना नगरसेवक) ● विनायक वाबळे (नगरसेवक) ● अभिषेक घोसाळकर (शिवसेना नगरसेवक) ● बाबा सिद्दिकी (माजी राज्यमंत्री)
विरोधकांची सरकारवर जोरदार टीका
● बाबा सिद्दिकी यांची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. या हत्येनंतर पोलिसांनी काही आरोपींनी अटक केल्याचे सांगण्यात आले. याबद्दल आमच्याकडे अधिकृत माहिती काहीही नसल्याने भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
● या सरकारच्या कारभाराबद्दलच संशय व्यक्त केला जातो. विरोधकांचे दूरध्वनी टॅप करणे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यातच सरकारी यंत्रणांचा वेळ जातो. राज्याच्या राजधानीत अशा हत्या होणार असतील तर कायद्याचे राज्य आहे कुठे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
● राज्यातील मुली, महिला, जनता सुरक्षित नाहीत. आता तर सत्ताधारी पक्षाचे नेतेच सुरक्षित राहिलेले नाहीत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
● राज्यात पुन्हा १९९०च्या दशकाप्रमाणणे राजकीय हत्या आणि टोळीयुद्द सुरू झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
‘पोलीस आयुक्तांमध्येच भांडणे’
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरल्याचे मत मांडले. मुंबईत सध्या दोन पोलीस आयुक्त आहेत. या दोघांमध्ये भांडण आहे. दोघेही नजरेला नजर भिडवत नाहीत. गृहमंत्र्यांचा कुठेही ठसा जाणवत नाही. वास्तविक फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.