जळगाव : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत देण्यात येणारे पैसे कोणी काहीही म्हटले असले, तरी परत घेतले जाणार नाहीत. लाडक्या बहिणींकडून ओवाळणी परत घेतली जाते का, असा प्रश्न उपस्थित करत ही योजना कायम सुरू राहणार असल्याचा निर्वाळा मंगळवारी येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिला.
शहरातील सागर पार्क मैदानावर जिल्हा प्रशासनातर्फे मंगळवारी महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले. लाडकी बहीण योजना चांदा ते बांदापर्यंत लोकप्रिय झाल्याने विरोधकांचा वांधा झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. १७ ऑगस्टला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार म्हणजे होणारच. सर्वांचे अर्ज स्वीकारण्यात येतील. त्यामुळे काळजी करू नका, असे आवाहन केले.
हेही वाचा >>>अलिबागमध्ये महायुतीत वादाची ठिणगी
‘विरोधकांकडून अपप्रचार’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, विरोधकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देण्याचे आवाहन केले. महिला सबलीकरण, सक्षमीकरण, सन्मान आणि त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम महायुतीचे सरकार करीत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, लाडकी बहीण योजनेतील पैसे परत घेण्यासाठी नाहीत, तुमच्यासाठी दिले आहेत, असे पवार यांनी नमूद केले.
त्रिमूर्तींचे सरकार असेपर्यंत…
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही विरोधकांसह स्वपक्षाच्या नेत्यांनाही खडे बोल सुनावले. निवडणूक आल्या आल्या विरोधकांकडून अपप्रचार केला जातो, असे फडणवीस म्हणाले. आमदार रवी राणा यांच्या १५०० रुपये काढून घेण्याच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर, फडणवीस यांनी पक्षाचे नेते गमतीजमतीत काहीही बरळून जातात, असे सुनावले. जोपर्यंत आमचे त्रिमूर्तींचे सरकार सत्तेत आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणींसाठीची ही योजना कुणीही बंद करू शकत नाही, असे फडणवीस यांनी नमूद केले.