नागपूर: नेत्यांचे वागणे, बोलण्यावरून नागपुरात कॉंग्रेसला झाले तरी काय? असा प्रश्न पडावा, अशा दोन घटना सोमवारी नागपुरात घडल्या. यातून पक्षाची नामुष्की तर झालीच. शिवाय नेत्यांबाबत चुकीचा संदेशही कार्यकर्त्यांमध्ये गेला.
पहिली घटना कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भातील आहे. नागपूरमध्ये आल्यावर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांशी बोललेच पाहिजे असा आग्रह असणा-या सर्वपक्षीय नेत्यांपैकी वडेट्टीवार एक आहेत. अपेक्षेप्रमाणे सोमवारी त्यांनी पहलगाम अतिरेकी हल्ल्यावर भाष्य करताना ‘ अतिरेकी’ प्रतिक्रिया दिली. त्यामुळे ते आणि त्यांचा पक्ष अडचणीत आले.
वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केल्यावर वडेट्टीवार यांना यू- टर्न घ्यावा लागला. वडेट्टीवार कॉंग्रेसचे आक्रमक नेते मानले जातात. वाचाळ भाजप नेत्यांना त्यांच्याच भाषेत प्रतिउत्तर देण्यात ते अग्रेसर असतात. पण पहलगाम प्रकरणात वादग्रस्त विधान करुन त्यांनी भाजपच्या हाती आयते कोलीत दिले. अतिउत्साह पडला.

दुसरी घटना उमरेडचे कॉग्रेस आमदार डॉ. संजय मेश्राम यांच्या संदर्भातील आहे. विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर, सरकारवर तुटून पडण्याचे दिवस असताना मेश्राम यांनी सार्वजनिक कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्यामुळे ते विरोधी पक्षाचे आमदार आहेत की सत्ताधारी भाजपचे हेच कळायला मार्ग नाही.

उमरेड मतदारसंघातील कॉंग्रेस आमदाराला भाजपमध्ये आणण्याची परंपरा आहे. २०१९ मध्ये कॉंग्रेस कडून निवडून आलेले राजू पारवे असेच तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी करून राहात असे. फडणवीस यांच्याच सूचनेनुसार राजू पारवे कॉंग्रेस सोडून प्रथम शिंदे सेनेत गेले व विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये आले. विद्यमान आमदार संजय मेश्राम यांनी केलेली फडणवीस यांची स्तुती ही पारवेंची आठवण करून देणारी आहे. इतर पक्षातील सक्षम नेत्यांना भाजपमध्ये आणा असा कानमंत्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिल्लीतील भाजप नेत्यांनी नागपूरच्या मेळाव्यात दिला होता हे येथे उल्लेखनीय.

एकूणच वरील दोन्ही नेत्यांचे वागणे- बोलणे लक्षात घेतले तर कॉंग्रेस नेत्यांना झाले तरी काय?असा प्रश्न कार्यकर्त्यंना पडला आहे.