मुंबई: राज्यातील अनाधिकृत, बोगस पॅथोलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी लवकरच कठोर कायदा आणणार असून यात नोंदणीशिवाय चालणाऱ्या लॅबवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. बोगस पॅथोलॉजी लॅबचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यभरातील बोगस पॅथोलॉजी लॅबबाबत सुनील राणे, अजय चौधरी, आशिष शेलार, राजेश टोपे, प्रकाश आबिटकर, योगेश सागर, नाना पटोले आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान सामंत बोलत होते. राज्यात एकूण ७ हजार ८५, तर मुंबईमध्ये सध्या १९७ हॉस्पिटलशी संलग्न ठिकाणी लॅब आहेत. मात्र अनाधिकृत लॅबवर कारवाई करण्याबाबत सध्या कायदेशीर अडचणी येत असल्यामुळे अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणण्यासाठी नवा कायदा आणण्यात येत आहे. त्यात विना नोंदणी लॅब सुरू असतील, तर त्यांना शिक्षेची तरतूद या कायद्यात असेल. तसेच जिल्हास्तरावर बोगस डॉक्टर शोध मोहिमेप्रमाणेच बोगस लॅब शोध मोहीम हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> कमला मिलच्या रमेश गोवानी यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, ६७ कोटी फसवणूक केल्याचा आरोप

नव्या कायद्यात बोगस पॅथोलॉजी लॅबवरील कारवाईसाठी कठोर तरतुदी करण्यात येतील. या कायद्याचा मसुदा सरकारकडे संमतीसाठी आला आहे. बोगस पॅथोलॉजी लॅबचा शोध घेण्यासाठी फिरते पथक निर्माण केले जाईल. नमुने गोळा करण्यासाठी उघडण्यात आलेल्या केंद्रासाठी अनुमती घेणेही कायद्याने बंधनकारक करण्यात येईल. बोगस ‘पॅथोलॉजी लॅब’ उघडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवला जाईल. याविषयी कायद्याला विलंब झाला, तर तोपर्यंत कारवाईसाठी नर्सिंग अॅक्टमध्ये आवश्यक तो बदल करण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

राज्यात बोगस पॅथोलॉजी लॅबचा सुळसुळाट झाला आहे. या लॅबमध्ये प्रशिक्षित कर्मचारी आहेत का, वैद्याकीय अहवाल तयार करताना नियमांचे पालन होते का, आवश्यक स्वच्छता राखली जाते का, याची पाहणी करण्याची कोणतीच यंत्रणा नाही. या लॅबवर कारवाई करायची म्हटली तरी त्यासाठी कायदाही नसल्याची बाब विधानसभेत चर्चेला आली.

या लॅबना अग्निशमन दलाचे प्रमाणपत्रही देण्यात येत नाही. ‘नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर अॅड क्रॅलिब्रेशन लॅबोरेटरिज’ची मान्यता न घेता पॅथोलॉजी लॅब उघडल्या जात असल्याचे सुनील राणे यांनी सांगितले. तर, या लॅबमध्ये घेण्यात येणाऱ्या रकमेवर सरकारचे नियंत्रण नसल्याचा मुद्दा योगेश सागर यांनी मांडला. तर डॉक्टरांच्या डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. आशिष शेलार यांनी ‘पॅथोलॉजी लॅब’चे नमुने गोळा करण्यासाठी ठिकठिकाणी अनधिकृत केंद्रे उघडण्यात आल्याचे सांगितले. या वेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनीही त्यांच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यावर ‘पॅथोलॉजी लॅब’मधून चुकीचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती सभागृहात देऊन बोगस ‘लॅब’वर कारवाई करण्याची मागणी केली.